मुख्याध्यापिका सूनिता पुरींनी जपली सामाजिक बांधिलकी

निराधार 30 कुटुंबांना केले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

बारामती (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुणवडी (ता.बारामती) दत्तवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनाच नव्हे तर त्यांच्या पालकांनाही मदतीचा हात देऊन शाळेच्या मुख्याध्यापिका सूनिता पुरी यांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.

मागील काही दिवसांपासून कोरोना विषाणूमुळे जग लॉकडाऊन आहे, त्यामुळे देशासह महाराष्ट्रातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. समाजामध्ये एकीकडे सधन वर्ग असून त्यांच्या बाबतीत दैनंदिन व्यवहारासह जीवनावश्यक गरजांची पूर्तता करताना त्यांना फारशा अडचणी जाणवत नाहीत. परंतु ज्यांचे हातावर पोट आहे, विटभट्टीवर, रोजंदारीवर काम करतात आशा लोकांची लॉकडाऊनच्या काळात अतिशय दयनीय अवस्था झाली आहे.

दत्तवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना शासनाची मदत मिळाली मात्र गरजू निराधार पालकांना देखील मदतीची गरज आहे हे सामाजिक बांधिलकी जपत मुख्याध्यापिका सूनिता पुरी यांनी पालकांना मदत करण्याचा निर्णय घेतला. बांदलवाडी ता. बारामती येथील जवळपास 71 कुटुंबाच्या सर्वेक्षणाची जबादारी त्यांच्यावर होती. हे काम करत असतानाच शाळेतील सर्व मुलांच्या कुटुंबाला काहीतरी मदत करायचे त्यांनी ठरविले. त्यानुसार जीवनावश्यक वस्तू वाटप करण्याचा निर्णय घेतला.

हा उपक्रम राबवण्यासाठी केंद्रप्रमुख बाळकृष्ण खरात यांनी मान्यता दिली. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सविता वाघमोडे व गुनवडीचे सरपंच सतपाल गावडे त्यांची देखील मदत झाली. शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या निराधार 30 कुटुंबांना प्रत्येकी पाचशे रुपये किमतीचे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. प्रत्येक कुटुंबाला साखर, गोडेतेल, शेंगदाणे ,पोहे, रवा व मीठ प्रत्येकी एक एक किलो, कपड्याचे व अंघोळीचा साबण, तूरडाळ व चहा पावडर आशा एकूण 10 वस्तू देण्यात आल्या.

शाळेच्या वतीने मुलांना तांदूळ व इतर साहित्य वाटप करण्यासाठी माझ्या जि प प्राथमिक शाळा दत्तवाडी ता. बारामती या शाळेत गेले होते, तांदूळ वाटप करत असताना पालक महिलांच्या गप्पा माझ्या कानावर आल्या त्या दिवसापासून मला अस्वस्थ व्हायला लागले. म्हणून निराधार पालकांना देखील मदतीचा हात देण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या 30 कुटुंबाला मदत देण्यात आली.

सुनीता अरुण पुरी
(मुख्याध्यापिक, जि. प. प्राथमिक शाळा दत्तवाडी,ता. बारामती)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.