अग्रलेख : आणखी एका शेअर घोटाळ्याची धास्ती!

हर्षद मेहता, केतन पारेख यांची नावे आज काळाच्या पडद्याआड गेली असली, तरी त्यांच्या काळात झालेल्या शेअरबाजार घोटाळ्यामुळे अख्खा देश हादरला होता, हे अनेकांच्या आजही लक्षात आहे. हा घोटाळा बाहेर काढणाऱ्या सुचेता दलाल या पत्रकाराने काल मुंबईच्या शेअरबाजारात आणखी एक मोठ्या घोटाळ्याची आशंका व्यक्‍त केली आहे. त्यातून मुंबईचा शेअरबाजार पुन्हा हादरला आहे. 

सुचेता दलाल यांनी काल ट्‌विटर संदेश प्रसारित करून ही खळबळ उडवून दिली असली, तरी त्या संदेशात त्यांनी कोणत्याही कंपनीचा उल्लेख केला नव्हता, मात्र, शेअरबाजारात काही कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती बोगस पद्धतीने वाढवल्या गेल्या असल्याची शक्‍यता त्यांनी स्पष्ट शब्दांत व्यक्‍त केली आहे. गुंतवणूकदारांनी “त’ वरून ताकभात ओळखला. त्याचा मोठा फटका गौतम अदानी यांच्या उद्योग समूहाला बसला आहे. 

सुचेता दलाल यांचे ट्‌विट प्रसारित झाल्यानंतर अदानी उद्योग समूहाच्या शेअर्सचे बाजारमूल्य एका दिवसात तब्बल एक लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. गेल्या वर्षभराच्या काळात अदानींच्या कंपन्यांचे भाव 5 ते 10 पटीने वाढले होते. करोनाच्या काळात देशातील अनेक कंपन्यांचे दिवाळे वाजत असताना अदानी उद्योग समूहातील गुंतवणूक आणि त्यांच्या शेअर्सचे बाजारमूल्य मात्र सतत वाढताना दिसत होते. 

काल या कृत्रिम फुगवट्याला टाचणी लागली आणि त्यांच्या शेअरचे भाव एका दिवसात 5 ते 20 टक्‍क्‍यांनी घसरले. पण ही पडझड कालच्या एकाच उद्योग समूहापुरती मर्यादित आहे, की त्याची व्याप्ती याहीपेक्षा मोठी आहे याची धास्ती अजूनही कायम आहे. सुचेता दलाल यांच्या संदेशातून काही तरी भयंकर घडले आहे आणि ते लवकरच बाहेर येणार आहे, असे वातावरण निर्माण झाले आहे. 

अदानी उद्योग समूहाचे नाव जेव्हा चर्चिले जाते त्यावेळी त्याचा मोदी सरकारशी संबंध आपसुकच जोडला जातो. कारण मोदी आणि गौतम अदानी यांची मैत्री जगजाहीर आहे. या उद्योग समूहाची मोदी सरकारच्या काळात झालेली भरभराट अवाक करणारी ठरली आहे. या उद्योग समूहाला सरकारी वरदहस्त लाभला असल्याचे लपून राहिलेले नाही. 

सरकारच्या मदतीने एखादा उद्योग समूह भरभराटीला आला असला, तरी त्यांची ही भरभराट निकोप व सुदृढ स्वरूपाची असेल तर त्यात चिंता करण्याचे काही कारण नव्हते. पण या उद्योग समूहातील शेअर्सच्या किमती कृत्रिम रितीने वाढवल्या गेल्या असल्याची बातमी खरी असेल, तर त्याची मात्र चिंता करावीच लागणार आहे. 

तशातच “नॅशनल सिक्‍युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड’ कंपनीने अदानी उद्योग समूहात पैसे गुंतवलेल्या तीन विदेशी कंपन्यांचे सुमारे 43 हजार कोटी रुपयांचे शेअर्स गोठवल्याचीही बातमी आली. त्यातून वातावरण आणखी गढूळ झाले आहे. “सेबी’च्या ट्रॅकिंग सिस्टिममधूनही या कथित घोटाळ्याचे सूतोवाच झाले आहे. 

अदानी उद्योग समूहाचे मालक गौतम अदानी हे जगातले चौदाव्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. इतक्‍या अल्पावधीत त्यांनी ही उंची कशी गाठली या मागचे इंगीतही आता बाहेर येण्याची गरज आहे. संपूर्ण देशातील उद्योगधंद्यांच्या अधोगतीच्या काळात हा उद्योग समूह मात्र रोज आपली संपत्ती वाढवत राहिला आहे. 

यात काही तरी गौडबंगाल असल्याची कुणकुण तज्ज्ञांना आधीच लागली होती. पण बोलण्याचे धाडस होत नव्हते. पण आता या विषयाला तोंड फुटले आहे. विदेशी गुंतवणूकदारांची मदत घेऊन आपल्या कंपन्यांच्या शेअर्सची त्यांनी कृत्रिमरितीने किंमत वाढवली असावी आणि आता हे बिंग फुटण्याच्या बेतात आले आहे. वर नमूद केल्याप्रमाणे हा प्रकार केवळ याच एका उद्योग समूहाच्या बाबतीत आहे की, अजूनही काही कंपन्यांचेही बिंग यापुढे फुटणार आहे याचा अजून अंदाज लागत नसल्याने निर्माण झालेल्या धास्तीचे अन्यही विपरीत परिणाम भोगावे लागणार आहेत. 

एकतर आधीच भारतातील गुंतणुकीचे वातावरण नाजूक बनले आहे. विदेशी गुंतवणूकदारांचा विश्‍वास अजूनही आपण परत मिळवलेला नाही, त्यात अशा स्वरूपाच्या मोठ्या घोटाळ्याच्या शक्‍यतेने आपल्या शेअरबाजाराची उरलीसुरली विश्‍वासार्हताही संपुष्टात येऊन शेअर मार्केटचा पुरता बोजवारा उडणार आहे काय, या शंकेने अनेकांची झोप उडाली असेल. या पार्श्‍वभूमीवर आता सेबी किंवा अन्य सरकारी तपास यंत्रणेनेही तातडीने हस्तक्षेप करून यातील तथ्य शोधून काढले पाहिजे. 

अदानी म्हणजे सरकारी जावई असल्याचे मानून त्यांच्या बाबतीत चौकशीत कोणतीही चालढकल करणे परवडणारे नाही. अर्थमंत्रालयानेही यात हस्तक्षेप करण्याची गरज असून या साऱ्या प्रकरणांवर त्यांनीही जाणीवपूर्वक लक्ष ठेवणे गरजेचे आहे. आज देशातल्या अनेक मध्यमवर्गीयांचीही शेअरबाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आहे. 

बॅंकातला पैसा आता फार सुरक्षित नाही किंवा त्यातून मिळणारे व्याजही दिवसेंदिवस कमी होत चालले आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन अनेकांनी मधल्या काळात शेअर गुंतवणुकीचा पर्याय स्वीकारला आहे. म्युच्युअल फंड आणि एसआयपीच्या माध्यमातून अनेक निम्न मध्यमवर्गीयांनीही भविष्यातील सुरक्षेसाठी या गुंतवणुकीचा मार्ग अवलंबला आहे. 

शेअरबाजारात फार मोठ्या स्वरूपात पडझड झाली तर याचा फटका या लोकांनाही बसू शकणार आहे. त्यामुळे आधीच अडचणीत आलेल्या या वर्गाला आणखी मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे या पडझडीतून सामान्य गुंतवणूकदारांना वाचवण्यासाठी सरकारी हस्तक्षेप आवश्‍यक ठरतो. सामान्य मध्यमवर्ग आज चारही बाजूने अडचणीत आला आहे. 

पूर्वीच्या काळी ज्यांनी चार पैसे साठवले आहेत तीच आज त्यांची उरलीसुरली पुंजी असून यापुढील काळात तरी त्याच आधारावर या लोकांची भविष्यातील वाटचाल अवलंबून असणार आहे. त्यामुळे या प्रकरणात सामान्य गुंतवणूकदारांच्या जीवाला लागलेला घोर जितक्‍या लवकर संपुष्टात येईल तितके ते सोयीस्कर ठरणार आहे. 

शेअरबाजारात मोठ्या खेळ्या करणाऱ्यांचे जे काय व्हायचे ते होवो, पण यातून सामान्य गुंतवणूकदार नागवला जाणार नाही याकडे लक्ष देणे अधिक महत्त्वाचे आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.