उपाययोजनांना पक्षी फारशी दाद देत नसल्याचे निरीक्षण
पुणे – उड्डाणावेळी विमानांना पक्ष्यांची धडक बसू नये, यासाठी विमानतळ प्रशासनातर्फे विविध उपाययोजना अवलंबल्या जातात. मात्र, पक्ष्यांकडून या उपाययोजना “अडॉप्ट’ म्हणजेच आत्मसात केल्या जात असल्याने त्या फारशा प्रभावी ठरत नाहीत. परिणामी, देशभरातील विमानतळ परिसरातील पक्ष्यांचे अस्तित्व प्रशासनासाठी चिंताजनक ठरत असून, यासाठी नेमका काय उपाय करावा, याचा अभ्यास पक्षीतज्ज्ञांकडून केला जात आहे.
पक्ष्याच्या धडकेमुळे विमानात तांत्रिक बिघाड निर्माण होणे, विमान प्रवास रद्द होणे, अपघात यासारख्या गंभीर घटना अलीकडील काळात वाढल्या असल्याचे दिसून येत आहे. पक्ष्यांच्या धडकेमुळे विमानांना होणारे नुकसान, वाढता धोका हा नागरी विमान कंपन्यांसोबतच हवाई दलासमोरील चिंतेचा विषय बनत आहे. हवाईदल आणि डॉ. सालीम अली सेंटर फॉर ऑर्निथोलॉजी यांनी केलेल्या संयुक्त अभ्यासाअंतर्गत विमानांना धडकणाऱ्या पक्ष्यांमध्ये कबूतर, वटवाघूळ, घार, गिधाड यांसारख्या शहरी पक्ष्यांचे प्रमाण सर्वाधिक असून, मुख्यत: विमानतळाच्या आसपास असलेल्या कचऱ्यामुळे हे पक्षी आकर्षित होत असल्याचे समोर आले आहे. या अभ्यासानुसार, सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे धावपट्टीजवळ पक्ष्यांना रोखण्यासाठी अवलंबण्यात येणाऱ्या उपाययोजनांना हे पक्षी आत्मसात करत आहेत. पक्ष्यांना रोखण्यासाठी केले जाणारे आवाज, गन फायर, गॅस एक्स्पोल्डस यासारख्या उपाययोजनांना पक्षी फारशी दाद देत नसल्याने ते उपाय सक्षम ठरत नाहीत. परिणामी, धावपट्टी परिसरात पक्ष्यांचे वास्तव्य आहे तसेच कायम राहते. त्यामुळेच उड्डाण करतेवेळी विमानांना हे पक्षी धडकण्याचा धोका कायम असतो.
“बर्डस्ट्राइक’ हा देशभरातील विमान कपंन्या आणि हवाईदलासाठी एक चिंतेचा विषय बनला असून, यामुळे होणारे नुकसान हे कोट्यवधी रुपयांचे असते. अनेकवेळा मोठ्या प्रमाणात जीवितहानी देखील होते. हा धोका टाळण्यासाठी याबाबत ठोस उपाय होणे गरजेचे आहे, ही बाब लक्षात घेत, पक्षी तज्ज्ञांकडून याबाबत अभ्यास सुरू असून, याबाबत लवकरच सकारात्मक उपाययोजना समोर येतील.
– डॉ. पी. प्रमोद, डॉ. सालीम अली सेंटर फॉर ऑर्निथोलॉजीमधील प्रमुख शास्त्रज्ञ