पुणे | एसटी- चारचाकीची समोरासमोर धडक

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – जुन्या मुंबई- पुणे महामार्गावर खडकी रेल्वे स्टेशन परिसरात रविवारी (दि. २५) सकाळी पाउणेनऊ वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. एसटी बसने एका चारचाकी कारला समोरून दिलेल्या धडकेत भूमिअभिलेख विभागात उपअधीक्षक पदावर कार्यरत असलेल्या महिला अधिकाऱ्याचा मृत्यू झाला,
तर अधिकारी महिलेचे पती, भाऊ, एक दुचाकीस्वार आणि बसमधील प्रवासी असे १४ जण जखमी झाले आहेत. मनीषा विजयसिंह भोसले (४०, रा. कवठे महांकाळ, सांगली) असे मृत्यू झालेल्या अधिकारी महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी खडकी पोलिसांनी बसचालक अनंत पंजाबराव उईके (३३, रा. नारायणगाव, मूळ. यवतमाळ) याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. एसटी बसमधून १२ प्रवासी प्रवास करत होते.
ही बस नारायणगाव आगाराची आहे. येथील परिसरात रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे काही लेन बंद आहेत. अपघात झालेली वाहने एकाच लेनमधून जात होती. त्या वेळी हा अपघात झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा भोसले ह्या मूळच्या सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथील आहेत. त्यांचे पतीही शासकीय खात्यात नोकरीस आहेत. नुकतीच मनीषा यांची पलूस येथून पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे बदली झाली होती. त्यांनी हडपसर येथे घर भाड्याने घेतले होते.
घरातील सामान शिफ्टिंगचे काम सुरू होते. मनीषा ह्या पतीसह चिखली येथे राहणाऱ्या भावाकडे आल्या होत्या. रविवारी सकाळी त्या चारचाकीतून हडपसरकडे निघाल्या होत्या. त्यांचा भाऊ गाडी चालवित होता, तर पती समोरच्या सीटवर बसले होते. मनीषा ड्रायव्हर सीटच्या मागे बसल्या होत्या.
खडकी रेल्वे स्टेशन परिसरात त्यांची गाडी आली असता, एसटी बसने त्यांच्या चारचाकी गाडीला समोरून धडक दिली. त्यामध्ये गाडीतील तिघे जखमी झाले.
मनीषा गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. त्यांचे पती आणि भावावर उपाचार सुरू आहेत.
वाकडेवाडी शिवाजीनगर येथून ही बस नारायणगावकडे निघाली होती. चालकाच्या म्हणण्यानुसार त्याची बस खडकी रेल्वेस्टेशन परिसरात आली असता, एका दुचाकीस्वाराने बसला ओव्हरटेक केले. त्यामुळे बसचालकाचे स्टेरिंगवरील नियंत्रण सुटले.
त्या वेळी बसने समोरील चारचाकी गाडी आणि एका दुचाकीस्वाराला धडक दिली. दुचाकीस्वार देखील या अपघातात जखमी झाला आहे, तर बसमधील प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एकूण १४ जण या अपघातात जखमी झाले आहेत.
सकाळी झालेल्या अपघातामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अपघातात बसचे आणि चारचाकी गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
त्यामुळे अपघाताची दाहकता लक्षात येते. घटनेची माहिती मिळताच खडकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. एसटी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील कारवाई सुरू आहे.





