पुणे, दि. 28 -प्रदूषणमुक्त नद्या करण्यासाठी महापालिका जपानमधील “जायका’ कंपनीच्या सहकार्याने मुळा-मुठा नदी संवर्धन प्रकल्प राबवत आहे. त्या अंतर्गत शहरात निर्माण होणारे सांडपाणी 100 टक्के शुद्ध करूनच नदीत सोडले जाणार आहे. सुमारे 1,500 कोटींचा हा प्रकल्प असून त्यात “जायका’कडून 990 कोटींचे कर्ज केंद्र सरकारच्या माध्यमातून दिले जाणार आहे.
2016 मध्ये मंजूर झालेल्या या प्रकल्पाचे अखेर ऑक्टोबरमध्ये सुरू केले जाणार आहे. या कामासाठीच्या सर्व प्रकारच्या सर्व्हेचे काम 10 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करून त्यानंतर तातडीने काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी “जायका’ कंपनीचे प्रतिनिधी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच या प्रकल्पासाठी जागांची पाहणी केली, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. या प्रकल्पाचे काम सुरू करताना एकाच वेळी 11 सांडपाणी शुद्धीकरण केंद्रांचे काम सुरू केले जाणार असून त्यासाठीच्या आवश्यक असलेल्या जागाही महापालिकेच्या ताब्यात आलेल्या आहेत.
असा आहे प्रकल्प
शहरात दररोज 873 एमएलडी सांडपाणी निर्माण होते. मात्र, महापालिकेकडे सध्या 10 सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प असून त्यातून केवळ 450 एमएलडी पाणी शुद्ध होते. त्यामुळे देशातील सर्वाधिक प्रदूषित नद्यांमध्ये मुळा-मुठा नद्यांचा समावेश आहे. आता “जायका’ प्रकल्पात 11 सांडपाणी शुद्धीकरण केंद्र उभारली जाणार असून त्यांची क्षमता सुमारे 850 एमएलडी प्रतीदिन असेल. त्यामुळे जुन्या आणि नवीन प्रकल्पांमुळे 100 टक्के सांडपाणी शुद्ध करून ते मुळा-मुठा नदीत सोडले जाईल. हे पाणी कालव्याद्वारे शेतीसाठीही देता येईल.
23 गावांचाही समावेश करणार
“जायका’ प्रकल्पाच्या कामातच समाविष्ट 23 गावे आणि पाडण्यात येणाऱ्या जुन्या 6 सांडपाणी केंद्रांचाही समावेश करावा. त्यासाठी प्रकल्प आराखडा तसेच आवश्यक निधी द्यावा, अशी मागणी महापालिका प्रशासनाने “जायका’कडे केली आहे. त्यासाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून त्यांच्याकडून तत्वत: मान्यता मिळताच तत्काळ प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.