नवी दिल्ली : कुप्रसिद्ध निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील सर्व चारही दोषींना याच महिन्यात 22 जानेवारीला फाशी दिले जाणार आहे. दिल्लीतील पतियाळा हाऊस न्यायालयाने आज याबाबतचे आदेश दिले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सतिश कुमार अरोरा यांनी चारही दोषींच्या उपस्थितीतच त्यांच्याबाबतचे “डेथ वॉरंट’ जारी केले.
चारही दोषींना व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सुनावणीसाठी उपस्थित केले गेले होते. “डेथ वॉरंट’नुसार 22 जानेवारीला सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पवन कुमार गुप्ता, अक्षय, विनय आणि मुकेश या चारही जणांना फाशी दिले जाणार आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी राम सिंह याने खटल्याची सुनावणी सुरू असतानाच तिहार कारागृहात आत्महत्या केली होती.
तर आणखी एक आरोपी गुन्हा घडला तेंव्हा अल्पवयीन होता. त्याला बालसुधारगृहामध्ये पाठवण्यात आले होते. तेथून तीन वर्षांनी त्याची सुटका करण्यात आली होती. उर्वरित चारही दोषींना सत्र न्यायालयाने 13 सप्टेंबर 2013 रोजी फाशीची शिक्षा सुनावली असून दिल्ली उच्च न्यायालयाने मार्च 2014 मध्ये ही शिक्षा कायम ठेवली होती.
त्या आदेशांच्या विरोधात चौघांनीही सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने चौघांच्याही फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले आहे. या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी दोषींनी दाखल केलेली याचिकाही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
निर्भयाच्या पालकांनी चारही दोषींच्या फाशीच्या शिक्षेच्या त्वरित अंमलबजावणीच्या मागणीसाठी पतियाळा हाऊस न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवरील निकाल न्यायालयाने आज सकाळी राखून ठेवला होता. न्यायालयाने निकाल सुनावताच चारही दोषींच्या वकिलांनी या निर्णयाविरोधात कायदेशीर हालचाली करणार असल्याचे वार्ताहरांना सांगितले.
या दोषींपैकी एकाच्या वडिलांनी दाखल केलेली याचिका न्यायालयाने कालच (सोमवारी) फेटाळून लावली होती. या प्रकरणातील एकमेव साक्षीदाराच्या जबाबाच्या विश्वासार्हतेवर या याचिकेद्वारे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. या साक्षीदाराचा छळ करण्यात आल्याचा दावा या याचिकेत केला गेला होता. तसेच या साक्षीदाराच्या विरोधात “एफआयआर’ नोंदवण्याची मागणीही या याचिकेत केली गेली होती.
पवन कुमारच्या वडिलांनी केलेल्या अर्जावरील आदेशही न्यायालयाने आजपर्यंत राखून ठेवल्याचे न्यायालयाने 20 डिसेंबरच्या सुनावणीच्यावेळी सांगितले होते.
या प्रकरणातील पीडीत तरुणीच्या मैत्राने न्यायालयामध्ये पूर्वग्रहापोटी चुकीचा जबाब दिला असल्याचे या अर्जामध्ये म्हटले होते.
पीडीत तरुणीचा मैत्र हा या गुन्ह्याच्यावेळचा एकमेव साक्षीदार आहे. सहा नराधमांनी 16 डिसेंबर 2012 रोजी चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार आणि हत्या केली तेंव्हा तोच निर्भयाच्या बरोबर होता.