पोटाच्या आजारासाठी दवाखान्यात गेला अन् करोना पॉझिटिव्ह निघाला

वेल्हे (प्रतिनिधी) – वेल्हे तालुक्यातील कातवडी येथील ८५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या पोटात दुखू लागल्याने उपचार करण्यासाठी पुणे येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना करोना टेस्ट करायला सांगितल्यानंतर टेस्ट केली असता पॉझिटिव्ह निघाली.त्यामुळे या संबंधित व्यक्तीस कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

त्यांच्या संपर्कातील एका व्यक्तीची स्वॅब वेल्हे येथील कोवीड केअर सेंटरमध्ये घेऊन पुढे पाठविण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अंबादास देवकर यांनी दिली आहे.

कातवडी गावच्या हद्दीलगत असलेल्या कोळवडी गावामध्ये लॉकडाउन कालावधीमध्ये मुंबईहून आलेल्या व परत मुंबईला कामासाठी गेलेल्या ४८ वर्षीय व्यक्तीस कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले असून, या व्यक्तीने गावाकडे असणारे कुटुंब घेऊन जाण्यासाठी कोळवडी गावात येऊन पुन्हा दोन ते तीन दिवस मुक्काम केला आहे. त्यामुळे गावातील अनेक व्यक्तींच्या ते संपर्कात आल्याची भिती व्यक्त केली जात आहे. या व्यक्तीच्या संपर्कातील तीन जणांना तपासणीसाठी आरोग्य विभागाने वेल्हे येथील कोविड केअर सेंटरमध्ये नेले आहे.त्यांचे स्वॅब पुढे तपासणीसाठी पाठविली आहे.

या परिसरातील कोळवडी व कातवडी गावे सील करण्यात आली असल्याची माहिती वेल्ह्याचे तहसीलदार शिवाजी शिंदे यांनी दिली आहे.वेल्हे तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या ३७ वर पोहचली असून, ३४ रुग्ण बरे झाले असून, तीन जणांवर उपचार चालु आहेत.बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या इतरही व्यक्तींनी स्वतःहून पुढे येऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभाकडून करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.