करोनाकाळात खर्चात कपात; ‘या’ राज्य सरकारने थांबवले राजभवन, मुख्यमंत्री निवासस्थानाचे बांधकाम

रायपूर – छत्तिसगढमधील कॉंग्रेस सरकारने गुरूवारी महत्वाचे बांधकाम प्रकल्प थांबवण्याचा निर्णय घेतला. करोना संकटकाळात खर्चात कपात करण्यासाठी ते पाऊल उचलण्यात आले.
छत्तिसगढच्या नव्या विधानसभा इमारतीच्या उभारणीसाठी जारी करण्यात आलेल्या निविदा रद्द करण्यात आल्या. त्याशिवाय, नवे राजभवन, मुख्यमंत्री निवासस्थान आदींच्या बांधकामाला स्थगिती देण्यात आली.

त्याविषयीचा निर्णय मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी ट्‌विटरवरून जाहीर केला. संबंधित प्रकल्पांसाठीचे भूमिपूजन 2019 च्या अखेरीस म्हणजे करोना संकट दाखल होण्यापूर्वीच करण्यात आले. राज्यातील जनतेला आमचे प्राधान्य आहे. त्यामुळे आताच्या संकटकाळात संबंधित प्रकल्प थांबवण्यात येत आहेत, असे बघेल यांनी स्पष्ट केले.

करोनाविरोधी लढ्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांना प्रचंड निधी उपलब्ध करावा लागत आहे. मात्र, करोना संकटकाळात दिल्लीत सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे काम सुरू असल्यावरून विरोधक आणि विशेषत: कॉंग्रेस मोदी सरकारवर टीकेची झोड उठवत आहे.

त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने छत्तिसगढमधील बांधकाम प्रकल्पांचा विषय उपस्थित केला. आता भाजपच्या टीकेची हवा काढून घेण्यासाठी छत्तिसगढमधील कॉंग्रेस सरकारने महत्वाचे पाऊल उचलले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.