मुंबई – आपल्या वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या रिऍलिटी शो-मधील स्पर्धकाने मराठी भाषेबद्दल गरळ ओकल्याबाबत अखेर कलर्स वाहिनीने माफीनामा सादर केला आहे. तर जान कुमार नामक एका स्पर्धकाने त्याच्या चुकीची जाणीव करून देत त्याला नॅशनल टेलिव्हिजनवर माफी मागावी लागली आहे. जानने मराठी लोकांची माफी मागून यापुढे अशी चूक करणार नाही अशी ग्वाही दिली.
यातच आता या प्रकरणावर जान कुमारची आई रीटा भट्टाचार्य यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रिटा म्हणाल्या, ‘खरं तर जान मराठी भाषेवर नव्हे तर निक्की आणि राहुल यांच्यावर संतापला होता. तो कधीही मराठीचा अपमान करणार नाही. माझा जन्म महाराष्ट्रात झाला आहे.माझ्या पतीचं संपूर्ण करिअर महाराष्ट्रातच घडलं आहे. आम्ही आमच्या महाराष्ट्रीय मित्रमंडळींसोबत मराठीतच संभाषण करतो. मग माझ्या मुलाला मराठीचा राग का येईल? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
त्या पुढे म्हणाल्या, जानने मराठी भाषेबद्दल जे वाक्य उच्चारलं त्याचा अर्थ चुकीच्या पद्धतीने लावला जातोय. तरी देखील मी माझ्या मुलाच्या वतीने महाराष्ट्राच्या जनतेची हात जोडून माफी मागते.