बारामती (प्रतिनिधी) – शहरातील सायली हिल परिसरात १०१ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. मंगेशनाना ओमासे मित्र मंडळाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. सायली हिल येथील नागरिकांनी या वृक्षांचे पालकत्व स्वीकारले.
शहरातील सायली हिल परिसरातील साफसफाई केल्यानंतर मित्र मंडळाच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजिक अंतर ठेवून वृक्षारोपण करण्यात आले. वढ ,कडूनिंब तसेच जांभूळ या प्रकाचे १०१ वृक्ष यावेळी लावण्यात आले. बारामती नगर परिषदेचे गटनेते सचिन सातव, उद्योजक रमनिक मोता, वनविभागाचे अधिकारी राहुल काळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सायलीहिल येथील नागरिकांनी सामूहिक श्रमदान करून वृक्षसंवर्धनाची जबाबदारी घेतली. येथील १०१ कुटुंबांनी झाडे दत्तक घेऊन त्यांचे पालकत्व स्वीकारले.
मंगेश नाना ओमासे मित्र मंडळ व सायली हिल येथील नागरिकांनी श्रमदानातून तसेच नगरपरिषदेच्या सहकार्यातून केलेले कार्य कौतुकास्पद आहे . आठ दिवस उपक्रम राबवून या परिसरातील साफसफाई करण्यात आली तसेच वृक्षारोपण देखील करण्यात आले . सर्वांच्या सहकार्याने हा परिसर स्वच्छ झाला . या उपक्रमामुळे बारामतीत एकजुटीचा सायली हिल पॅटर्न नावारूपाला आला आहे. तो इतरांनाही मार्गदर्शक ठरेल असे मत गटनेते सचिन सातव यांनी यावेळी व्यक्त केले.
स्वच्छ सुंदर व हरित बारामती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अभिप्रेत आहे. त्या अनुषंगाने बारामती शहरात वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. शहरातील सायली परिसरात देखील अशा प्रकारचा साफसफाई व वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला आहे . त्याला येथील नागरिकांचे सहकार्य मिळाले आहे इथून पुढील काळात देखील या परिसरात समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येतील असे मत मंगेश ओमासे यांनी यावेळी व्यक्त केले . यावेळी नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे तसेच उद्धव विभागाचे मजीद पठाण यांचीदेखील सहकार्य लाभले. त्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.