मुंबई – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच मुंबई दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी मुंबईतील मेट्रो 2 A आणि मेट्रो 7 चे तसेच विविध विकासकामांचे उद्घाटन केले. यावेळी देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणे झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी स्तुतीसुमने उधळली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमने उधळली.
राज्यातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आले होते. मोदींच्या स्वागतासाठी मुंबई आणि प्रदेश भाजपने यावेळी जोरदार तयारी केली होती. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्यात मोठी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचं समोर आलं आहे. एका व्यक्तीने चक्क एनएसजी कंमाडोचे नक्कली आयकार्ड गळ्यात अडकवून आणि कडक सफारी घालून ही घुसखोरी केली.
देशाचे सर्वांत शक्तीशाली पद म्हणजे पंतप्रधानांचे असते. त्यामुळे मोदी यांना कडेकोट सुरक्षा पुरविण्यात आलेली होती. तरी देखील या व्यक्तीने ही घुसखोरी केल्याचं समोर आलं आहे. मात्र, मुंबई पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलं असून, सध्या त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
“रामेश्वर मिश्रा’ असे या घुसखोरी करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे. बीकेसीच्या मैदानात मोदींच्या सभेदरम्यान व्हीआयपी गेटद्वारे शिरण्याचा प्रयत्न या व्यक्तीने केला होता. त्यावेळी पोलिसांना त्याचा संशय आला आणि तेव्हापासून हा तपास सुरू करण्यात आला. सध्या मुंबई पोलीस रामेश्वर मिश्रा याची कसून चौकशी करत आहेत.