मुलभूत समस्यांवर ते एक शब्दही बोलत नाहीत – राहुल गांधी

औसा: मोदी व भाजपचे नेते लोकांचे लक्ष अन्यत्र विचलीत करण्यासाठी भलतेच विषय सध्या उपस्थित करीत आहेत. पण लोकांच्या मुलभूत समस्यांविषयी ते एका शब्दानेही बोलत नाहीत. देशात उद्योगधंद्यांची वाट पुर्ण वाट लागली असून बेरोजगारी चाळीस वर्षात नव्हती इतकी वाढली आहे.

मेक ईन इंडियाचा फज्जा उडाला असून भारतात सगळ्या चिनी वस्तु विक्रीला येत आहेत. त्यातून चीनच्या युवकांना नोकऱ्या मिळत आहेत पण भारतातील बेरोजगार युवक हताशपणे हिंडतो आहे अशा शब्दात कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज मोदी सरकारवर आक्रमक भाषेत टीकास्त्र सोडले.

्‌‌‌लातुर जिल्ह्यातल्याल औसा येथील कॉंग्रेसचे उमेदवार बसवराज पाटील यांच्या प्रचारार्थ त्यांनी आज प्रचार सभा घेतली त्यावेळी ते बोलत होते. त्यांची महाराष्ट्रातील ही पहिलीच प्रचार सभा होती. लोकसभा निवडणुकीनंतर सुमारे सहा महिन्यांच्या अवधीनंतर राहुल गांधी हे पुन्हा कॉंग्रेसच्या प्रचारात सक्रिय झालेले दिसले. त्यांनी आज अत्यंत आक्रमकपणे मोदी सरकारवर हल्लाबोल केला. महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली असा सवाल त्यांनी केला.

त्याला नाही असे उत्तर आल्यानंतर ते म्हणाले की मोदींनी आपल्या उद्योगपती मित्रांची साडे पाच लाख कोटींची कर्ज माफी केली पण शेतकऱ्यांना द्यायला त्यांच्याकडे पैसे नाहीत. मोदी केवळ त्यांच्या जवळच्या दहा पंधरा उद्योगपतींसाठी त्यांचे सरकार चालवत आहेत. त्यांनी आपल्या उद्योगपती मित्रांचे सव्वा लाख कोटी रूपयांचे कर माफ केले असेही त्यांनी नमूद केले. पण आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही. देशातल्या मुलभूत समस्या सोडून ते भलतेच विषय उपस्थित करीत असतात. लोकांचे लक्ष विचलीत करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. लोक जेव्हा रोजगाराचा प्रश्‍न उपस्थित करतात त्यावेळी ते लोकांना चंद्राकडे बघायला सांगतात.

सहा महिन्यांनी आणखी वाट लागलेली असेल
देशाच्या अर्थव्यवस्थेची मोठी वाट लागली आहे असे नमूद करून राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले की देशातील गुंतवणूक व रोजगाराची स्थिती अत्यंत भीषण झाली आहे. अजून पाच सहा महिन्यांनी देशाची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झालेली असेल असा इशाराही त्यांनी दिला. या स्थितीवर सरकारचे लक्ष नाही आणि प्रसार माध्यमांमधूनही त्याचा आवाज उठत नाही कारण ही प्रसार माध्यमेही अडानी आणि अंबानींसारख्या उद्योगपतींच्या हातात गेली आहेत असा आरोप त्यांनी यावेळी केला.

इस्त्रो कॉंग्रेसने उभी केली. त्यासाठीची रॉकेट्‌स बनवण्यासाठी अनेक वर्षांचा काळ जाऊ द्यावा लागला आहे. हे काही एकदोन दिवसांत झालेले नाही. पण चंद्रावर रॉकेट पाठवण्याच्या प्रयोगाचा लाभ मोदी उठवत आहेत. केवळ आकाशात रॉकेट सोडून बेरोजगाराच्या पोटात तुम्हाला अन्न घालता येणार नाही असे प्रतिपादन त्यांनी केले. मोदींच्या जवळच्या मेहुल चोकसी, नीरव मोदींसारख्या लोकांनी कोट्यावधी रूपये लुटून विदेशात पलायन केले. त्यांचे कोणीही काही वाकडे करू शकत नाही. कारण पंतप्रधान त्यांचे मित्र आहेत असा दावाही त्यांनी केला.

या साऱ्या विषयाच्या बाबतीत माध्यमे बातम्या का दाखवत नाहीत किंवा मोदींना का प्रश्‍न विचारत नाहीत असा सवालही त्यांनी केला. नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीमुळे संपुर्ण देशातील छोटे व्यापारी आणि दुकानदार यांचा पार सत्यानाश झाला. यामुळे आमचा लाभ झाला असे सांगणारा एकही दुकानदार तुम्हाला देशात भेटणार नाही असे ते म्हणाले.
कॉंग्रेसला महाराष्ट्राने नेहमीच मोठा आधार दिला असे नमूद करून ते म्हणाले की येथील लोकांच्या मनात कॉंग्रेस आहे. त्यामुळे त्या आधारावर आम्ही येथील निवडणूक जिंकणार आहोत असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

Leave A Reply

Your email address will not be published.