मांजरी (पुणे) – हडपसर विधानसभा मतदार संघात आम्ही मंजूर करून आणलेली अनेक कामे सध्या निधीअभावी रखडलेली आहेत तर, काही कामे अर्ध्यावर सुरू झाली आहेत. विद्यमान आमदारांनी यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. अडीच वर्षात एकही काम ते मार्गी लावू शकले नाहीत, अशी टीका माजी आमदार योगेश टिळेकर यांनी केली.
मांजरी बुद्रुक रेल्वे उड्डाणपूलाच्या रेंगाळलेल्या कामामुळे नागरिकांना वाहतूकीचा होत असलेला त्रास, निधी अभावी रखडलेले पाणी योजनेचे काम, ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी करावी लागणारी वणवण या प्रश्नांकडे प्रशासन व सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी महादेवनगर येथे भाजप कार्यकर्त्यांनी माजी आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको व धरणे आंदोलन केले त्यावेळी आयोजित सभेत रखडलेल्या विकासकामांचा आढावा घेताना माजी आमदार योगेश टिळेकर बोलत होते.
भाजपचे हडपसर विधानसभा अध्यक्ष संदीप दळवी, शहर पदाधिकारी भूषण तुपे, संदीप लोणकर, अविनाश मगर, गणेश घुले, नितीन होले, स्वाती कुरणे, पुरूषोत्तमआण्णा धारवडकर, अमीत घुले, सुमित घुले, प्रमोद कोद्रे, इम्तियाज मोमीन, सुनील धुमाळ, राजेंद्र भिंताडे, शैलेश बेल्हेकर, गजेंद्र मोरे, बबन घुले, उज्वला टिळकेर, शोभा लगड, छाया गदादे, रोहिणी धारवडकर, स्मिता गायकवाड, वंदना कोद्रे, डॉ. प्रीती व्हिक्टर, सुनंदा पाटील आदिंसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. रस्त्यावर ठिय्या मांडून आंदोलन केले. पदाधिकाऱ्यांनी मनोगते व्यक्त करून प्रशासन व विद्यमान आमदारांच्या निष्क्रियतेचा खरपूस समाचार घेतला. माजी आमदार टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली प्रशासकीय अधिकाऱ्यांना यावेळी रेल्वे उड्डाणपूल व पाणीयोजनेचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
“चौपदरी असलेला मांजरीच्या मुळामुठा नदीवरील पूल दुपदरी करण्यात आला आहे. रेल्वेगेट वरील उड्डाणपूल ही रेंगाळला आहे.निधी अभावी पाणी योजना रखडवली आहे. मग आमदार काय करतात ? सरकार दुर्लक्ष करीत असेल तर त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे, आम्हीही त्यांच्या खांद्याला खांदा लावून या आंदोलनात सोबत उतरू.’ मतदारसंघातील रखडलेली विकासकामे तातडीने पूर्ण झाली नाहीत तर येत्या काळात सोलापूर रोडवर तीव्र आंदोलन केले जाईल. –
(योगेश टिळेकर, माजी आमदार, हडपसर विधानसभा)