प्योगयेंग – गेल्या काही काळापासून उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांच्याविषयीच्या वेगवेगळ्या चर्चाना चांगलेच उधाण आले आहे. किम जोंग ऊन हे सध्या कोमामध्ये असल्याचा दावा दक्षिण कोरियाकडून करण्यात आला आहे. मात्र, हा दावा फोल ठरला आहे. उत्तर कोरियाच्या अधिकृत एजन्सीने किम जोंग ऊन यांचा एका बैठकीतील फोटो शेअर केला आहे. यामुळे आता पुन्हा एकदा किम जोंग उन यांची संपूर्ण जगभरात चर्चा होत आहे.
कोरियन सेंट्रल न्यूज या वृत्तसंस्थेने किम जोंग ऊन यांचा पक्षाच्या काही सदस्यांसोबत बैठकीतील फोटो शेअर केला आहे. करोना व्हायरस आणि गुरुवारी होणार असलेल्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ते ही बैठक घेत आहेत. या फोटोमध्ये किम जोंग ऊन यांची प्रकृती चांगली दिसत आहे. मात्र, हा फोटो जुना कि नवा आहे याबाबत अद्यापही माहिती मिळालेली नाही.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीही किम जोंग उन यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली होती. परंतु त्यानंतर एका प्रकल्पाच्या उद्घाटनाप्रसंगी सर्वांसमोर येऊन त्यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला होता. मात्र, काहीच दिवसांपूर्वी “आपल्या माहितीनुसार किम जोंग उन हे सध्या कोमाममध्ये आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत देशाची धुरा त्यांची बहिण किम यो जोंग सांभाळत आहेत,” अशी माहिती दक्षिण कोरियाचे माजी गुप्तचर अधिकारी चांग सोंग मिन यांनी कोरियातील एका माध्यमाशी बोलताना दिली. सत्ता सांभाळण्याची किम यो जोंग यांची पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी किम जोंग उन यांच्यासोबत काम केले आहे.