पुणे : किराणा मालाच्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी आतील ड्रॉवरमध्ये ठेवलेली 1 लाख 60 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. तसेच, जाताना चोरांनी खजुराचे पाकिट आणि डिओ स्प्रे असा दोन हजारांचा ऐवजही नेला. कर्वेनगरमध्ये रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
सुरेशकुमार डांगी (38) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे . त्यानुसार वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्वेनगरमधील आदित्य टेरेस या इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर फिर्यादी डांगी यांचे किराणा मालाचे दुकान आहे. शनिवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास त्यांनी दुकानास कुलूप लावले. त्यानंतर चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास दुकानाचे शटर उचकटून ऐवज चोरून नेला. रविवारी सकाळी साडेआठ वाजता दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर दुकान फोडल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कदम हे करीत आहेत.