डॅरेन सामीने केला धक्कादायक खुलासा; आयसीसीने करावी कठोर कारवाई
जमैका –अमेरिकेत जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर वर्णद्वेषाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यातच क्रीडा क्षेत्रातही हा प्रकार घडतो, असे वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सामी व आक्रमक फलंदाज ख्रिस गेल यांनाही आपल्याला याचा सामना करावा लागला होता असे सांगितले होते. मात्र, रविवारी सोशल मीडियावरील एका चॅटमध्ये बोलताना सामीने भारतातील प्रसिद्ध आयपीएल क्रिकेट स्पर्धेतदेखील वर्णद्वेषाचा सामना केल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.
कृष्णवर्णीय फ्लॉइडच्या मृत्यूनंतर जगात अनेक स्तरांवर हा मुद्दा चर्चिला जात आहे. त्यातच सामीने केलेला खुलासा आता काय वळण घेणार याकडे सर्व जगाचे लक्ष लागले आहे. त्यातच सामीने केलेला खुलासा आता कोणते वळण घेणार यावर चर्चा सुरू आहे.
आयपीएलमधील एक संघ सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना प्रेक्षक कालू या नावाने हाक मारायचे. इतकेच नाही तर श्रीलंकेचा खेळाडू थिसेरा परेरा याच्यावरही त्याच्या रंगावरून टोमणे मारायचे. या शब्दाचा मला आधी अर्थच समजला नव्हता, पण जेव्हा याबाबत मी एका भारतीय खेळाडूशी बोललो तेव्हा त्याने मला अर्थ सांगितला. त्यावेळी खूप वाइट वाटले की, आजही काही लोक रंगाला इतके महत्त्व देतात. हा भेद कायम राहिला तर क्रीडा क्षेत्राचेच नाही तर समाजस्वास्थ्याचेही नुकसान होऊ शकते, असे मत सामीने व्यक्त केले.
एखाद्याला त्याच्या व्यंगावरून जसे बोलू नये तसेच त्याच्या रंगावरूनही बोलू नये. प्रेक्षक जेव्हा मला उद्देशून टोमणे मारायचे त्यावेळी त्यांचा राग येत नसे तर त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वायटायची. आयपीएल स्पर्धा खेळताना हा अनुभव मला व परेराला जवळपास प्रत्येक सामन्यात आला. हा प्रकार जर संपुष्टात आणायचा असेल तर प्रत्येक देशाने तसेच आयसीसीने प्रयत्न केले पाहिजेत, असेही सामीने सांगितले.