मुंबई – रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात 0.75 टक्क्याने कपात केल्यानंतर बऱ्याच बॅंकांनी आपल्या कर्जावरील व्याजदरात काही प्रमाणात कपात केली आहे. मात्र, आता बॅंकांना आपल्या ठेवींवरील व्याज दरातही कपात करावी लागणार असल्याचे दिसून येत आहे. एचडीएफसी बॅंकेने आपल्या ठेवींवरील व्याज दरात पाव टक्क्यापर्यंत कपात केली आहे.
बॅंकेच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार 30 ते 45 दिवसांच्या ठेवीवरील सर्वसामान्यांसाठीचे व्याजदर 5.5 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांसाठीचे व्याज दर 6 टक्के करण्यात आले आहेत. अगोदर सर्वसामान्यांसाठी हा व्याजदर 5.75 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.25 टक्के इतका होता.
एक वर्षाच्या ठेवीवरील व्याज दरातही 0.20 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. कर्जावरील व्याजदर कमी होणार असल्यामुळे ठेवीवरील व्याजदरही इतर बॅंका कमी करण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते.