नवी दिल्ली : देशातील सर्वांत मोठी खासगी बँक असलेल्या HDFC बँकेने आपल्या काही नियमांमध्ये बदल केले आहेत. यामुळे ग्राहकांना थोडा दिलासा मिळणार आहे. तुम्ही देखील एचडीएफसी बँकेचे ग्राहक असाल आणि या बँकेचे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. एचडीएफसीने आपल्या क्रेडिट कार्ड युजर्ससाठीच्या काही नियम आणि शुल्कांमध्ये बदल केले आहेत. हे सर्व बदल 1 ऑगस्ट 2024 पासून लागू होणार आहेत.
‘या’ 8 नियमांमध्ये करण्यात आले बदल
1) भाड्याच्या ट्रान्झॅक्शनवर 1 टक्का शुल्क:
1 ऑगस्ट 2024 पासून, एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डशी संबंधित नियम बदलत आहे. आता क्रेड, चेक, मोबीक्विक आणि फ्रीचार्जसारख्या ॲप्सद्वारे भाडं भरल्यास, ट्रान्झॅक्शन रकमेवर 1 टक्का शुल्क आकारण्यात येणार आहे. हे शुल्क जास्तीत जास्त 3 हजार रुपयांपर्यंत असेल.
2) बिझनेस कार्ड्स असलेल्या ग्राहकांसाठी नियम
बिझनेस कार्ड असलेल्या ग्राहकांनी एकाच वेळी पेट्रोल भरण्यासाठी 30 हजार रुपयांपेक्षा कमी खर्च केला, तर त्यांच्याकडून कोणतंही अतिरिक्त शुल्क घेतलं जाणार नाही. मात्र, एकाचवेळी 30 हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचं पेट्रोल भरल्यास संपूर्ण रकमेच्या एक टक्का शुल्क आकारलं जाईल. हे शुल्क तीन हजार रुपयांपेक्षा जास्त नसेल.
3) पेट्रोल-डिझेल पेमेंटवर सवलत
15 हजार रुपयांपेक्षा कमी पेट्रोल आणि डिझेलच्या पेमेंटवर कोणतंही अतिरिक्त शुल्क लागणार नाही. 15 हजार रुपयांपेक्षा जास्त पेमेंट केल्यावर एक टक्का शुल्क आकारण्यात येणार आहे. हे शुल्क जास्तीत जास्त तीन हजार रुपयांपर्यंत असेल.
4) 3.5 टक्के मार्कअप फी
तुम्ही दुसऱ्या देशाच्या चलनात कोणताही व्यवहार केल्यास, तुम्हाला 3.5 टक्के मार्कअप शुल्क आकारले जाईल. इन्फिनिया, इन्फिनिया(मेटल एडिशन), डायनर्स ब्लँक, डायनर्स ब्लॅक (मेटल एडिशन), बिझ ब्लँक मेटल कार्ड, रेगालिया गोल्ड, बिझपॉवर, टाटा न्यू इन्फिनिटी एचडीएफसी बँक आणि 6E रिवॉर्ड्स इंडिगो XL साठी हे शुल्क 2.5 टक्के असणार आहे.
5) लेट पेमेंट फी स्ट्रक्चरमध्ये बदल
HDFC बँकेकडून लेट पेमेंट फी स्ट्रक्चरमध्येही बदल करण्यात आले आहेत. उद्यापासून 100 रुपयांपेक्षा कमी पेमेंटवर लेट फी भरावी लागणार नाही. 101 ते 500 रुपयांदरम्यानच्या पेमेंटवर 100 रुपये, 501 ते 1000 रुपयांच्या पेमेंटवर 500 रुपये, 1001 ते 5000 रुपयांच्या पेमेंटवर 600 रुपये, 5001 ते 10000 रुपयांच्या पेमेंटवर 750 रुपये, 10001 ते 25000 रुपयांच्या पेमेंटवर 900 रुपये, 25001 आणि 50000 रुपयांच्या पेमेंटवर 1100 रुपये आणि 50,000 किंवा त्याहून अधिकच्या पेमेंटवर 1,300 रुपये लेट फी भरावी लागणार आहे.
6) 50 रुपयांची रिडम्पशन फी:
तुम्ही तुमचे रिवॉर्ड स्टेटमेंट क्रेडिट (कॅशबॅक) म्हणून रिडीम केल्यास, तुमच्याकडून 50 रुपये रिडम्पशन फी आकारली जाईल. इन्फिनिया, इन्फिनिया (मेटल एडिशन), डायनर्स ब्लॅक, डायनर्स ब्लॅक(मेटल एडिशन), बिजब्लॅक मेटल, स्विगी एचडीएफसी बँक, फ्लिपकार्ट होलसेल कार्डवर रिवॉर्ड रिडम्पशन फी लागू होणार नाही.
7) EMI प्रोसेसिंग फीमध्ये वाढ:
तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन शॉपमधून ईझी-ईएमआई पर्याय निवडल्यास, तुम्हाला 299 पर्यंत ईएमआय प्रोसेसिंग फी भरावी लागेल. पूर्वी 199 रुपये प्रोसेसिंग फी होती. सर्व प्रकारच्या फीवर सरकारने निश्चित केलेला जीएसटी स्वतंत्रपणे भरावा लागणार आहे.
8) जास्त व्याज
तुम्ही तुमच्या मासिक बिलापेक्षा कमी रक्कम भरल्यास, व्यवहाराच्या तारखेपासून संपूर्ण थकबाकी भरेपर्यंत तुम्हाला 3.75 टक्के (दरमहा) व्याज द्यावं लागेल. ही बाब पैसे आणि वस्तूंच्या सर्व खरेदीवर लागू होते. इन्फिनिया, इन्फिनिया (मेटल एडिशन), डायनर्स ब्लॅक, डायनर्स ब्लॅक(मेटल एडिशन), बिजब्लॅक मेटल कार्ड्ससाठी दरमहा 1.99 टक्के व्याज असेल.