नवी दिल्ली – उत्सवाच्या काळात कर्जाचा उठाव वाढावा म्हणून म्हणून बॅंका चढाओढीने सवलती जाहीर करीत आहेत. एचडीएफसीने आज उत्सवाच्या काळासाठी काही सवलती जाहीर केल्या. त्यामध्ये व्याजदर 6.70 टक्के करण्याचा समावेश आहे. गेल्याच आठवड्यात स्टेट बॅंकेने घरासाठीच्या कर्जावरील व्याज दर 6.70 टक्क्यांपर्यंत कमी केला होता. त्यानंतर पंजाब नॅशनल बॅंक आणि बडोदा बॅंकेने व्याजदरात कपात जाहीर केली आहे.
एचडीएफसीच्या व्यवस्थापकीय संचालक रेणू सूद कर्नाड यांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षापासून घराच्या किमतीमध्ये फारशी वाढ झालेली नाही. मात्र व्याजदर कमी पातळीवर आहेत. त्यामुळे सध्या घर खरेदी करण्यासाठी उत्तम काळ असल्याचे दिसून येत आहे.
व्याजदर कमी पातळीवर असण्याबरोबरच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत काही प्रमाणात अनुदान मिळते. ज्या ग्राहकांचा क्रेडिट स्कोअर 800 किंवा त्यापेक्षा अधिक असेल अशा ग्राहकांना 20 सप्टेंबर पासून कमी व्याजदरावर कर्ज मिळेल. ते कुठल्याही क्षेत्रात असले किंवा कितीही रकमेचे कर्ज असले तरी हा सवलतीचा व्याजदर लागू होणार आहे. मात्र या सवलती फक्त 31 ऑक्टोबरपर्यंत चालू राहणार असल्याचे एचडीएफसीने स्पष्ट केले आहे.