‘एचसीएमटीआर’ रस्त्याचे डिझाईन बदलणार

बोपोडीतील बाधीत घरे वाचविण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

पुणे – महापालिकेच्या उच्च क्षमता वर्तुळाकर मार्ग (एचसीएमटीआर) रस्त्याचे बोपोडी येथील आराखडा (डिझाईन) बदलण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाकडून काम सुरू करण्यात आल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांकडून देण्यात आली. प्रामुख्याने बोपोडी येथील मिळकती या रस्त्याच्या कामात अडथळा ठरत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

या रस्त्यासाठी महापालिका प्रशासनाकडून संयुक्‍त मोजणी सुरू झाल्यानंतर या रस्त्यातील बाधितांना नोटीसा बजाविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. हा रस्ता सुरू होतो त्या बोपोडीतील अनेक इमारती, दुकाने आणि घरे बाधीत होत त्यांना महापालिकेच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे धस्तावलेल्या नागरिकांनी मागील आठवड्यात महापालिकेत गर्दी केली होती. तसेच, प्रशासनाने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा निर्णय दिला होता. त्यामुळे महापालिका प्रशासनाने नागरिकांची बैठक घेऊन त्यांना या मार्गाची माहिती देण्यात आली. मात्र, यावेळी धस्तावलेल्या नागरिकांनी महापालिकेच्या या प्रकल्पास विरोध केल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे भविष्यात या रस्त्याला विरोध झाल्यास प्रशासनाची चांगलीच कोंडी होणार होती. ही बाब लक्षात घेऊन आता प्रशासनाने बोपोडीच्या हद्दीत येणाऱ्या मिळकती वाचविण्यासाठी रस्त्याची रचना काही प्रमाणात बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी संबंधित सल्लागाराशी चर्चा करण्यात आली असून लवकरच याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

प्रशासनाकडूनच एक पाऊल मागे
महापालिकेच्या विकास आराखड्यात 36 किमीचा “एचसीएमटीआर’ मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. प्रशासनाने आता या मार्गाचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. हा संपूर्ण मार्ग इलिव्हेटेड असून अस्तित्त्वातील रस्त्यावरूनच त्याची आखणी करण्यात आली आहे. या रस्त्याची रुंदी 24 मीटर (अंदाजे 80 फूट) इतकी आहे. त्यानुसार प्रशासनाने मार्ग (अलाईमेंट) निश्‍चित केला आहे. त्यात बोपोडीतील भाऊपाटील रस्त्यावरून आंबेडकर चौक पुढे विद्यापीठ परिसरातून विद्यापीठ गेटसमोरून सेनापती बापट रस्त्यावरून हा मार्ग पुढे जाणार आहे. मात्र, ज्या ठिकाणी हा मार्ग सुरू होतो, त्या ठिकाणी या मार्गावर जाण्यासाठी व उतरण्यासाठी रॅम्प असणार आहेत. या रॅम्पमध्ये या मिळकती बाधीत होत आहेत. तसेच, या रस्त्याचे आरक्षण असतानाही हा रस्ता पूर्णत: उन्नत (इलिव्हेटेड) होईल याची कोणतीही कल्पना प्रशासनास नसल्याने त्यांच्याकडून बोपोडीमध्ये अनेक ठिकाणी नवीन बांधकामांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेच्या ही चूक लक्षात घेऊन एखादा नागरिक कोर्टात गेल्यास या रस्त्याचे काम अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनानेच एक पाऊल मागे घेत, या दोन्ही रॅम्पची जागा बदलून मिळकती बाधीत होणार नाहीत, अशा पध्दतीने त्याची रचना करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.