“एचसीएमटीआर’ मार्ग विमानतळ भागात बदलणार

संरक्षण विभागाच्या महापालिकेस सूचना
पुणे –
वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने प्रस्तावित केलेल्या उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्ग अर्थात “एचसीएमटीआर’चा लोहगाव विमातळाच्या संरक्षित हद्दीजवळील मार्ग बदलण्यात यावा, अशा सूचना संरक्षण विभागाने महापालिकेस केल्या आहेत. या मार्गात येणाऱ्या संरक्षण विभागाच्या जागेची संयुक्त मोजणी तसेच भूसंपादनाच्या चर्चेसाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मागील आठवड्यात हवाईदल अधिकाऱ्यांची भेट घेतली.

यावेळी या सूचना करण्यात आल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. त्यात येरवडा कारागृह आणि फाईव्ह नाईन चौकातील रस्त्याचा समावेश आहे. महापालिकेकडून सुमारे 36 किलोमीटर लांबीचा हा संपूर्ण उन्नत मार्ग उभारण्यात येणार आहेत. यासाठी सात हजार कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. पुणे शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी 1987 च्या विकास आराखड्यात हा रस्ता प्रस्तावित करण्यात आला होता. मागील दोन वर्षांपासून प्रशासनाने ठोस पावले उचलत रस्त्याचा आराखडा तयार केला असून, निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.

या रस्त्यासाठी सुमारे 40 टक्के जागा शासकीय असून त्यात लष्कराच्या 10 टक्के जागेचा समावेश आहे. या जागेची मोजणी करण्यासाठी संरक्षण विभागाची परवानगी आवश्‍यक आहे. त्यासाठी महापालिकेने तसा प्रस्तावही संरक्षण विभागाकडे पाठविला आहे. त्या सोबतच पालिकेकडून संरक्षण विभागाच्या ज्या खात्याच्या जागेची आवश्‍यकता आहे, त्या खात्याच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना या रस्त्याची माहिती तसेच जागेची माहिती दिली जात आहे. मागील आठवड्यात महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी हवाई दल अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना या रस्त्याची माहिती दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.