नवी दिल्ली – माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या एचसीएल टेक कंपनीचा नफा तिसर्या तिमाहीत 5.5 टक्क्यांनी वाढून 4,591 कोटी रुपये इतका नोंदला गेला आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत या कंपनीला 4,350 कोटी रुपयांच्या नफ्यावर समाधान मानावे लागले होते. या तिमाहीत कंपनीचा महसूल पाच टक्क्यांनी वाढून 29,890 कोटी रुपये झाला आहे. जो की गेल्या वर्षी या तिमाहीत 28,446 कोटी रुपये होता.
जागतिक चलन बाजारात कमालीची अस्थिरता आहे. त्याचबरोबर जागतिक परिस्थिती खराब असल्यामुळे परदेशातील ऑर्डरवर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीतही कंपनीने समाधानकारक कामगिरी केली असल्याचे कंपनीच्या व्यवस्थापनाने म्हटले आहे. बाजार बंद झाल्यानंतर ताळेबंद जाहीर करण्यात आला. त्या अगोदर या कंपनीच्या शेअरचा भाव 0.52 टक्क्यांनी कमी होऊन 1,985 रुपये प्रति शेअर या पातळीवर होता. दरम्यान कंपनीने प्रति शेअर 18 रुपये लाभांश जाहीर केला आहे.