HBD Sachin Tendulkar : स्पेशल माणसाचा वाढदिवस… 

फेसबुकमुळे वाढदिवस लक्षात ठेवणे कमी त्रासाचे झाले आहे. पूर्वी मी डायरीमध्ये लिहून ठेवायचो. पण आता आपल्यासाठी  ते काम mark zuckerberg च करत आहे म्हटल्यावर कशाला ना उगाच त्रास घ्यायचा. असो, पण माझ्या मित्र-मैत्रिणींपैकी काही जणांचे वाढदिवस अगदी कायम लक्षात राहतात. त्यासाठी ना त्या डायरीची गरज असते ना मार्कची. कारण त्यांचा वाढदिवस असतोच अशा स्पेशल दिवशी. मला कायमच त्यांच्याबद्दल हेवा वाटत आला आहे. २४ एप्रिल हा असाच एक स्पेशल दिवस. सचिन तेंडुलकर, ४५ वर्षांचा झाला आज. त्यात एवढं विशेष वाटण्यासारखं नाहीये काही. पण मला वाटतं. त्याचं कारण सचिनची कारकीर्द. त्याच्या २४ वर्षांच्या मॅरेथॉन कारकिर्दीत त्याने मोडलेले रेकॉर्डस्, त्याने काढलेली प्रत्येक धाव, प्रत्येक शतक, त्याने मैदानावर घालवलेला प्रत्येक क्षण हा माझ्यासाठी स्पेशलच होता. त्याला रिटायर होऊन ५ वर्ष झाली तरी त्याची माझ्या मनात असणारी क्रेझ जराही कमी झालेली नाही. 

तो खेळत असताना क्रिकेट मधल्या अनेक महारथींचे रेकॉर्डस् मोडून तो सतत चर्चेत असायचा. आताच्या खेळाडूंसाठी त्याचे रेकॉर्डस् एखादं चॅलेंज म्हणून भासतात जे मोडल्यावर पुन्हा सचिनचंच नाव चर्चेत येतं. चांगल्या कारणांनीही लोकांच्या चर्चेत राहता येतं यासाठी आजच्या काही खेळाडूंसाठी सचिनचं उत्तम उदाहरण आहे. वयाच्या १६व्या वर्षी वसीम अक्रम आणि वकार युनिस सारख्या बॉलरचा निडरपणे सामना करणं, शरीरावर एवढ्या शस्त्रक्रिया होऊन देखील तब्बल २४ वर्ष देशासाठी खेळत राहणं, आंतरराष्ट्रीय शतकांचं शतक, या आणि यांसारख्या अनेक गोष्टी आहेत ज्या सचिन ला महान बनवतात.

सचिनला भारतरत्न दिला तेंव्हा अनेकांचं दुमत झालं होतं, खेळत असतानाही तो स्वतःसाठी खेळतो असा बऱ्याच जणांचा नारा असायचा, अशा लोकांना मी नास्तिक समजतो आणि माझी भक्ती तशीच चालू ठेवतो. माझ्या सारख्या लाखो करोडो भक्तांसाठी आहेच तो देवासारखा. पण देव नाही. कारण देव मानलं की त्याने केलेलं कार्य सहजंच झालं असं होतं. तो माणूसच आहे पण त्याने केलेलं कार्य दैवी आहे. त्याचं मंदिर बांधू नका पण त्याचा आदर्श नक्कीच घ्या.

कोणीतरी असावं सतत आपल्याला प्रेरणा देणारं, ज्याच्याकडे बघून सतत काहीतरी चांगला करत राहावं असं वाटतं. मग त्यांचा वाढदिवस आपल्यासाठी स्पेशलच नाही का.  म्हणूनच मग रात्रीच व्हाट्सअँप चा dp बदलला. ऑफिस मध्ये आल्यावर desktop वरचा वॉलपेपर बदलला. हेडफोन लावून sachin a billion dreams सिनेमातलं गाणं ऐकलं, लंच ब्रेक मध्ये हा लेख लिहून काढला आणि परत जाऊन Youtube वर त्याचे विडिओ बघायचे म्हणजे झाला बर्थडे सेलेब्रेट. माझ्यासारख्या एखाद्या वेड्या चाहत्याला आणखी काय हवं असतं.

– अक्षय मलिकपेठकर (एक सचिन भक्त)

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)