HBD Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या पहिल्या वहील्या द्विशतकाबद्दल… 

प्रिय सचिन, 
तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!! तुझ्या दर वाढदिवसाला तुझ्याविषयीच्या आठवणी डोळ्यासमोरून जातात… त्यातल्याच या दोन महत्वाच्या आठवणी इथं शेअर करतोय… 

1994 ची गोष्ट असेल. मी साधारण तिसरी-चौथीत होतो त्यावेळी. तेव्हा तू वांद्रे पूर्वमधल्या साहित्य सहवासमध्ये राहायचास. मी त्या वेळी वांद्य्रातल्या सरकारी वसाहतीमध्ये राहायचो. मला त्या वेळी क्रिकेटबद्दल एवढं काही माहिती नव्हतं. फक्त टीव्हीवर मॅच लागली, की मोठ्यांकडून तुझं नाव ऐकू यायचं. आम्ही जिथं राहायचो, तिथं चौकामध्ये राजूदादाचं गॅरेज होतं. एकदा या राजूदादाच्या गॅरेजमध्ये तुझ्या घरची गाडी दुरुस्तीसाठी आली होती. ती गाडी परत देण्याच्या निमित्ताने राजूदादाने एक शक्कल लढविली. तुझी गाडी तर घेतलीच; पण सोबत त्याची मारुती ओमनीसुद्धा घेतली. मी माझ्या काही मित्रांसोबत खेळत होतो. राजूदादाने आम्हाला सर्वांना बोलावलं आणि सांगितलं, की तो आम्हाला सचिन तेंडुलकरचं घर दाखवायला जाणार आहे. मग काय; आम्ही सगळे जण एकासुरात हो म्हणालो. मग आम्ही सगळे राजूदादासोबत त्याच्या ओमनीमधून साहित्य सहवासकडे निघालो. साहित्य सहवास आल्यानंतर राजूदादाने आम्हाला सगळ्यांना लांबूनच तुझं घर दाखवलं. त्यावेळी खरंच खूपच भारी वाटलं. आजही तो क्षण आठवला की खूप भारी वाटतं. ओमनीच्या खिडकीतून लांबूनच बघितलेलं तुझं घर अजूनही आठवतं…

तुझ्या प्रत्येक वाढदिवसानिमित्त मला तुझं पाहिलं वाहिलं द्विशतक आठवतं. त्याच्याबद्दलचीच ही पुढची आठवण…
1998 मध्ये तेव्हा ऑस्ट्रेलियाची टीम भारत दौऱ्यावर आली होती. मुंबई विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरू होता. एक पास माझ्या बाबांना मिळाला होता. तुझी मॅच बघायला मिळणार म्हणून कधीही शाळा न चुकवणारा मी, शाळेला दांडी मारून तुझा सामना बघायला गेलो. प्रथम श्रेणी सामना असल्याकारणाने एवढी गर्दी नव्हती. सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 305 धावा केल्या. दुसऱ्या दिवशी (25 फेब्रुवारी) ऑस्ट्रेलियाने त्यांचा डाव घोषित केला. मुंबईची फलंदाजी सुरू झाली. नेहमीप्रमाणे तू त्या दिवशी कोणत्या तरी दुसऱ्याच मूडमध्ये होतास. तू अक्षरश: ऑस्ट्रेलियाच्या बॉलर्सच्या चिंधड्या उडवल्यास. द्विशतकाच्या जसजसा जवळ येत गेलास, तसतशी ब्रेब्रॉर्नवर गर्दी वाढत गेली. मार्क टेलर, इयान हिली आणि ऑस्ट्रेलियन टीममधील सगळ्यांनी तुला सतावण्याचा खूप प्रयत्न केला; पण तू त्यांना सगळ्यांना पुरून उरलास… आणि तो क्षण आला. तू 198 वर होतास. तू तुझा नेहमीचा स्विप शॉट मारलास आणि दोन धावा घेण्याच्या उद्देशाने धावलास आणि दोन्ही धावा पूर्णही केल्यास. तुझं द्विशतक पूर्ण झाल्याबद्दल अख्खं स्टेडियम प्रचंड खूष झालं होतं. पण एवढ्यात ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर इयान हिली स्टम्पिंगचं अपील करत ओरडत असल्याचं सगळ्यांच्या लक्षात आलं. सगळेच एकदम टेन्शनमध्ये आले. पण अम्पायरने “नॉट आऊट’ असं सांगितलं आणि स्टेडियमवर अक्षरश: सगळे नाचायला लागले. तू तुझ्या स्टाईलनुसार बॅट हवेत भिरकावलीस आणि प्रेक्षकांना अभिवादन केलंस. या मॅचमध्ये तू 204 वर नाबाद राहिलास…

तुझे हे द्विशतक आजही जसेच्या तसे लक्षात आहे. मी ज्या स्टॅंडमधून ही मॅच बघितली होती, तिथं त्या वेळी हर्षा भोगलेसुद्धा उपस्थित होता. हर्षासोबत बघितलेले हे द्विशतक कायम लक्षात राहील. तुझे ते पहिले द्विशतक होतं. सध्या बरेच क्रिकेट पंडित वेगवेगळ्या खेळाडूंसोबत तुझं कम्पॅरिझन करतात. तेव्हा खरं तर वाईट वाटतं, त्यांना सगळ्यांना सांगावंसं वाटतं की समांतर रेषा या कधीच एकमेकांना दुभंगत नाहीत. आत्ता ज्या खेळाडूंची तुझ्याशी तुलना केली जाते ते आणि तू अगदी समांतर आहेत. त्यामुळे मी एवढंच सांगेन, की आमची पिढी खरोखरच खूप नशीबवान समजली जाईल. कारण आम्ही “मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरला खेळताना बघितलंय.
भविष्यात जगामध्ये जेव्हा जेव्हा क्रिकेटचा उल्लेख होईल, तेव्हा तो तुझ्या नावाशिवाय अपूर्ण असेल.
पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!!

– अमोल कचरे 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.