#HBD Bachchan : अमिताभ बच्चन यांचा आज 77 वा वाढदिवस

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज 77 वा वाढदिवस आहे. बॉलिवूडचे बिग बी म्हणून अमिताभ यांची लोकप्रियता आजही तशीच कायम आहे. अमिताभ यांनी चार दशकांहून अधिक मोठ्या कारकीर्दीत 180 हून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या. अमिताभ हे भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील सर्वात महान आणि प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक आहेत.

11 ऑक्‍टोबर 1942 मध्ये उत्तर प्रदेशच्या अलाहाबादमध्ये बिग बी यांचा जन्म झाला. जन्मापूर्वी त्यांचे नाव इन्कलाब श्रीवास्तव असे होते. परंतु त्यांचे हे नाव बदलून अमिताभ असे ठेवण्यात आले. अमिताभ म्हणजे असा प्रकाश जो कधीही कमी होत नाही. त्यामुळे बिग बींचं अमिताभ हे नामकरण करण्यात आलं. अमिताभ बच्चन यांच्या आईमुळे त्यांची पावलं रंगभूमीकडे वळली आणि याच जोरावर ते मुंबईमध्ये आले. या कालावधीमध्ये त्यांना वडीलांकडून साहित्याचाही मोठा वारसा मिळाला होता.

अमिताभ यांनी मुंबई गाठल्यानंतर भुवन शॉ, सात हिंदुस्तानी हे त्यांच्या कारकीर्दीतले अगदी सुरुवातीचे चित्रपट होते. त्यानंतर जंजीर, कुली, लावरिस, त्रिशूल, खून-पसीना, कालिया, अग्नीपथ, काला पथ्थर, डॉन या चित्रपटांमध्ये ते झळकले. विशेष म्हणजे हे सारेच चित्रपट त्याकाळी प्रचंड हिट ठरले. या सगळ्या चित्रपटांमधून वेळोवेळी बदलती समाजव्यवस्था, राजकारण, समाजकारण, आणि वाढती गुन्हेगारी याचे चित्रण झाले. त्यामुळे अमिताभ हिंदी चित्रपटसृष्टीतील एका नव्या प्रवाहाला निमित्त ठरले. चुपके-चुपके, नमक-हलाल, मिलीसारखे वेगळे चित्रपटही त्यांनी केले. तर सिलसिला, कभी-कभी, मुकद्दर का सिकंदर अशा चित्रपटांमधून प्रेमाची नवी परिभाषा उलगडली.

चित्रपट गाजविणाऱ्या अमिताभ यांना सात हिंदुस्तानी या चित्रपटाने पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला.त्यानंतर 1984 मध्ये पद्मश्री, 2001 मध्ये पद्मभूषण आणि 2015 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. तसंच चौदा फिल्मफेअर पुरस्कारही त्यांच्या नावे आहे. अभिनयाखेरीज पार्श्वगायक, चित्रपटनिर्माते आणि टीव्ही कार्यक्रम निर्माते म्हणूनही बच्चन यांनी काम केले आहे. 1984 ते 1987 या काळात ते लोकसभेवर निवडून गेले होते. दरम्यान, आज त्यांचा 77 वा वाढदिवस ते साजरा करत आहेत. अशा या अष्टपैलु आणि हरहुन्नरी अभिनेत्यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)