ट्रेलरना रिफ्लेक्टर नसल्याने रात्री अपघातांची शक्यता
शिक्रापूर -शिक्रापूरसह परिसरात तळेगाव ढमढेरे, न्हावरे, जातेगाव, पाबळ या रस्त्यावर, नगर महामार्गावर ट्रॅक्टर ट्रेलरच्या साह्याने धोकादायकरित्या ऊस वाहतुकीमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
सध्या सर्वत्र साखर कारखाने व गुऱ्हाळे सुरू असल्याने ऊस तोडणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. उसाची वाहतूक बैलगाड्या, ट्रॅक्टर ट्रेलर व ट्रकमधून होत आहे. मात्र ट्रेलरच्या साह्याने उसाची सर्वाधिक वाहतूक होत आहे. पुणे नगर महामार्गावर वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे, त्यातच उसाच्या ट्रेलरची भर पडली आहे. बऱ्याच वेळा ट्रॅक्टरला तीन ट्रेलर जोडलेले असतात. प्रमाणापेक्षा जास्त ऊस भरलेला असतो. त्यामुळे झोल जाऊन ट्रेलर उलटण्याच्या घटना घडत आहे.
दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी उसाच्या मोळ्या पडल्याने दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढत आहे. ट्रेलरला मागील बाजूस रिफ्लेक्टर नसल्याने रात्री अपघात होत आहे. बहुतांशी नवीन ट्रेलरला नंबर प्लेट नाहीत. हे चालकही मोठ्या आवाजात गाणी लावून बेदरकारपणे ट्रॅक्टर चालवत आहेत. ऊस वाहतूक करणाऱ्या चालकांवर कारवाईची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.