धोकादायक इमारतींचे पाणी, वीजपुरवठा होणार खंडित

गणेशोत्सव, मोहरमच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेकडून मालमत्ताधारकांना नोटिसा

नगर  – गणेशोत्सव, मोहरमनिमित्त शहरातील 132 इमारती महापालिकेकडून धोकादायक घोषित करण्यात आल्या इमारत मालकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. या इमारती काढून न घेतल्यास या इमारतींचा पाणी व वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.

महापालिका हद्दीत धोकादायक इमारतीची संख्या 162 असून त्यापैकी 28 इमारती निकाली काढण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात जुन्या इमारतींचा धोका लक्षात घेता महापालिकेने शहरातील धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे स्थलांतर करण्याची गरज आहे. त्यानुसार कोणतीही कार्यवाही अद्यापही महापालिकेकडून झाली नाही. केवळ नोटीसा बजावण्याचे काम केले जात आहे. गणेशोत्सव, मोहरम मिरवणूक मार्गात मोठ्या प्रमाणात धोकादायक इमारती आहेत. दाळमंडाई, पाचलिंब कोपरा, बुरुडगल्ली याठिकाणी जुने वाडे, धोकादायक इमारती आहेत. या धोकादायक इमारतींच्या मालकांना महापालिकेकडून पाणीपुरवठा विभाग व महावितरण विभागाला पत्र देण्यात आले असून संबंधितावर नळ जोड कनेन्क्‍शन तोडणार तर वीज पूरवठा खंडित करण्यात येणार आहे.

या इमारतींमुळे परिसरातील रहिवासी; तसेच रस्त्याने ये – जा करणाऱ्या नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. इमारतींचा धोकादायक भाग काढण्याबाबत महापालिका सातत्याने आवाहन करीत असली, तरी त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. शहरातील जुन्या इमारतींपैकी बहुतांश ठिकाणी घरमालक व भाडेकरू यांच्यात वाद सुरू आहेत. मात्र, या वादामुळे मोडकळीस आलेल्या इमारतींची साधी दुरुस्तीही झालेली नाही. या इमारती धोकादायक स्थितीत उभ्या आहेत. शहरातील धोकादायक इमारतींवर तसे फलकसुद्धा लावण्यात आले आहेत.

शहरातील बहुतांश मध्यवस्तीच्या भागात मोडकळीस आलेल्या घरांची संख्या जास्त आहे. काळू बागवान गल्ली, नालबंद खुंट, पारशा खुंट, रामचंद्र खुंट, डाळमंडई, मंगलगेट, चितळे रोड, सांगळे गल्ली, वंजारगल्ली, तेलीखुंट, जुना कापड बाजार, महात्मा गांधी रोड, गांधी मैदान, चौपाटी कारंजा, बागडपट्टी, पटवर्धन चौक, तोफखाना, खिस्तीगल्ली, तापकीरगल्ली, आडतेबाजार, माणकेश्‍वरगल्ली, अशा विविध भागांमध्ये अशा धोकादायक इमारती दिसतात. पावसाळ्यात या इमारतींची पडझड होण्याची शक्‍यता जास्त असते. त्यामुळे इमारतीत राहणारे कुटुंबासह या इमारतीच्या आसपासचे नागरिक, इमारतीच्या समोरील रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक, वाहने यांनाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून या इमारतीचा धोकादायक भाग उतरून घेण्याच्या नोटिसा दिल्या आहेत.

नगरमधील धोकादायक असणाऱ्या 162 इमारतींना आम्ही नोटिसा दिल्या आहेत. तसेच 30 वर्षांपूर्वीच्या इमारतींचे स्ट्रक्‍चर ऑडिट करण्याच्या सूचनाही दिल्या. धोकादायक इमारती काढून घेण्याची जबाबदारी घरमालकाची असून मात्र याकडे कोणीही लक्ष देत नाही.

विलास सोनटक्के शहर अभियंता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)