नवी दिल्ली – इंग्लंडमध्ये सुरू होणारा विश्वचषक अवघ्या काही दिवसांवर आला असतानाही, भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी कोण करणार हा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. मात्र, ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनने अंबाती रायडू हा भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी योग्य उमेदवार असल्याचे मत मांडले आहे.
यावेळी बोलताना हेडन म्हणाला की, माझ्यासाठी रायडू चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी योग्य पर्याय आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये त्याने भारतासाठी चांगली कामगिरी केली आहे. भारत चौथ्या क्रमांकाच्या जागेसाठी इतकी चर्चा का करतोय हे समजत नाही. लोकेश राहुलला चौथ्या क्रमांकाची जागा मिळेल असे मला वाटत नाही. त्याची संघातली जागा ही पर्यायी सलामीवीर म्हणून योग्य आहे. त्यामुळे माझ्या मते चौथ्या क्रमांकावर अंबाती रायडू हा योग्य फलंदाज आहे.
गेल्या वर्षभरात भारतीय संघ व्यवस्थापनाने चौथ्या क्रमांकाच्या जागेसाठी अनेक प्रयोग केले. 2018 पासून अंबाती रायडू, धोनी, केदार जाधव आणि मनीष पांडे या फलंदाजांना वेगवेगळ्या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली.