साताऱ्यातील हॉकर्स संघटनेचा सोमवारी बंद

सातारा – सातारा शहरात देवी चौक ते राजवाडा या दरम्यान सोमवारी सुरू होणाऱ्या अतिक्रमण मोहिमेला विरोध होण्याची चिन्हे आहेत. शहरातील साडेसहाशे हॉकर्स बंद पाळणार असून नियमात न बसणाऱ्या टपऱ्यांची पाहणी मोहिम हाती घेतली जाणार असल्याचे हॉकर्स संघटनेचे शहराध्यक्ष संजय पवार यांनी सांगितले. जोपर्यंत पालिका फेरीवाल्यांचा बायोमेट्रिक सर्वे पूर्ण करत नाही तोपर्यंत अतिक्रमण मोहिमेला विरोध करण्याचा इशारा पवार यांनी दिला.

साताऱ्यातील 475 हॉकर्स वाल्यांचा बायोमेट्रिक सर्वे पूर्ण झाला असून पोवई नाका ते हुतात्मा चौक दरम्यान जितके फेरीवाले आहेत त्यांची मोजणी बाकी आहेत. सातारा पालिकेकडून फेरीवाला क्षेत्र विकसनाचे काम सुरू असताना देवी चौक ते राजवाडा व चांदणी चौक मंगळवार तळे या दरम्यान भाजीमंडईचे फिरते टेंपो व छोट्या मोठ्या विक्रेत्यांचे प्रमाण वाढले असून या मार्गावर सायंकाळी पाच नंतर वारंवार वाहतुकीची कोंडी होत आहे.

साताऱ्यात देवी चौक ते मंगळवार तळे या रस्त्यावर अतिक्रमण मोहिम राबविली जाणार असून अतिक्रमण करणाऱ्यांची खैर नाही असा अल्टीमेटम मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी दिला आहे. मात्र हॉकर्स संघटना सदस्यांनी शनिवारी च बैठक घेउन्न विरोधाचा झेंडा फडकावला आहे. तहसीलदार कार्यालयालगतच्या फूटपाथवर संजय पवार व लक्ष्मणराव निकम यांनी बैठक घेऊन सर्व साडेसहाशे विक्रेत्यांचा बंद राहणार असल्याचे बैठकीत सांगितले. या बैठकीला संघटनेचे पासष्ट सदस्य उपस्थित होते. पवार यांनी हॉकर्स संघटनेला पालिका सहकार्य करत नसल्याची तक्रार केली. हुतात्मा चौक, आयआरके कॉर्नर, पोवई नाका, शाहू चौक ते राजवाडा या दरम्यान सर्व विक्रेत्यांचा सर्वे करणार असल्याचे पवार यांनी सांगितले. जे नियमाप्रमाणे दोन फूट फूटपाथ सोडत नाही त्यांची माहिती घेतली जाणार आहे.

पालिकेने हॉकर्स संघटनेशी चर्चा करावी, न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे फेरीवाला क्षेत्र विकसन करण्याची मागणी संजय पवार यांनी केली. मात्र पालिका आणि हॉकर्स यांच्यात संघर्षाचा भडका उडण्याची चिन्हे आहेत. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता जय्यत पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण मोहिम पहिल्या टप्प्यात देवी चौक ते राजवाडा या दरम्यान राबवली जाणार आहे. त्या निषेधार्थ हॉकर्स बंद पाळणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)