सातारा बसस्थानकानजीकचा प्रकार; अतिक्रमण मोहिमेवेळी पोलिसांमुळे टळला अनर्थ
सातारा – सातारा येथे अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध करत हॉकर्स संघटनेचे शहराध्यक्ष संजय पवार व लक्ष्मण निकम यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यावेळी घटनास्थळी उपस्थित इतर हॉकर्स संघटनेचे पदाधिकारी व पोलिसांनी त्यांना रोखत अनर्थ टळला. पोलिसांनी पवार यांना ताब्यात घेऊन त्यांना शहर पोलीस ठाण्याकडे रवाना केले. या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
साताऱ्यात नगरपालिकेने सोमवारपासून अतिक्रमण मोहीम तीव्र केली आहे. त्याच दिवसापासून वाहतूक शाखेनेही बसस्थानकासमोरील अतिक्रमणे काढण्यास फेरीवाल्यांना बजावले होते. मात्र, हॉकर्स संघटनेने त्याला विरोध करत मंगळवारी “रास्ता रोको’ केला. मात्र, पोलिसांनी धरपकड केली. गुरुवारी पुन्हा वाहतूक पोलिस आणि हॉकर्स संघटनेचे सदस्य आमनेसामने आले. पोलिस फेरीवाल्यांना हातगाड्यांमुळे वाहतुकीस अडथळा येत असल्याचे सांगून अतिक्रमण काढण्यास बजावत होते.
तर फेरीवाले हातगाडे हटवू नका, अशी विनंती करत होते. मात्र, पोलिस भूमिकेवर ठाम राहिले. बसस्थानकावर जमाव वाढू लागला. हॉकर्स संघटनेचे जवळपास तीनशे सदस्य त्याठिकाणी आले होते. याचवेळी संघटनेचे शहराध्यक्ष संजय पवार यांनी अंगावर रॉकेलने भरलेली बाटली अंगावर ओतून रिकामी केली.
त्याचवेळी त्यांचे सहकारी व पोलिसांनी त्यांना तेथेच रोखले. रॉकेलने भिजून गेलेल्या पवार यांना बाजूला नेऊन बसवले. या घटनेने सर्व आंदोलक संतापले. यानंतर सर्व जमाव शहर पोलिस ठाण्यात आला. पोलिसांनी जमावास शांततेचे आवाहन केले. त्यावेळी हॉकर्स संघटनेच्या सदस्यांनी पोलिसांच्या वाहतूक शाखेविरोधात तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या.