तेरा तालुक्यांपैकी सर्वाधिक 20 करोनाबाधित हवेलीत
पुणे – शहराबरोबरच करोनाचा प्रादुर्भाव आता ग्रामीण भागातदेखील पसरत आहे. तेरा तालुक्यांपैकी सर्वाधिक 20 रुग्ण हवेलीत आढळून आले आहेत. त्याखालोखाल वेल्हा तालुक्यात 8 करोनाबाधित रुग्ण आहेत. शहरालगत नागरीकरण जास्त असलेल्या गावांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यातील इतर गावांपेक्षा अधिक असल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.
ग्रामीण भागात सोमवारपर्यंतच्या (दि.27) एकूण आकडेवारीनुसार 35 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर नगरपालिका क्षेत्रात 7 रुग्ण आढळले आहेत. नगरपालिकांच्या हद्दीमध्ये केवळ बारामतीमध्येच हे 7 बाधित रुग्ण आहेत. तर, बारामतीमधील एका रुग्णाचा मृत्यू झाला असून पाच जणांना घरी सोडण्यात आले आहे. एकावर उपचार सुरू आहेत. सध्या हवेलीत सर्वाधिक 20 रुग्ण असून, 18 रुग्ण उपचार घेत आहेत. हवेलीमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळण्याचे कारण शहरालगतच्या गावांमधील नागरिकांचे पुण्यात ये-जा होत असल्याने संख्या अधिक असण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.
वेल्हा तालुक्यातील 8 पैकी 7 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत, तर एका रुग्णास घरी सोडण्यात आले आहे. शिरूर आणि भोरमध्ये प्रत्येकी 2 रुग्ण सापडले. त्यापैकी शिरूर तालुक्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. बारामती, जुन्नर आणि मुळशीमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आले, तर बारामतीतील रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
पहिल्यांदा आशा वर्करकडून सर्व्हेक्षण करत आहोत, बाहेरून आलेल्यांना क्वारंटाइन केले आहे. हवेलीमधील गावांमध्ये नागरीकरण जास्त आहे, पुण्यामध्ये जाणे-येणे असल्याने इतर रुग्णांच्या संपर्कात आले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. महापालिका क्षेत्राभोवती असलेल्या क्षेत्रामध्ये जास्त रुग्ण आढळले आहेत.
– डॉ. भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद.