हवेली पंचायत समिती उपसभापती पद निवडणुकीत शिवसेनेने प्रतिष्ठा राखली

जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर कटके ठरले किंगमेकर

पुणे – हवेली पंचायत समितीत एकुण 20 सदस्य असून, सध्या 10 सदस्यांसह पंचायत समितीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बहुमत आहे. तर शिवसेनेचे 6 सदस्य असून भारतीय जनता पक्षाचे 4 सदस्य आहेत. पंचायत समितीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व असतानाही सभापतीपद निवडणुकीतही शिवसेनेने घेतलेली भूमिका महत्त्वाची ठरत आली आहे. या पदावर राष्ट्रवादीचे उमेदवार विराजमान होताना शिवसेनेकडून सामजस्य दाखविण्यात आले. याच कारणास्तव उपसभापती पदावर शिवसेनेकडून प्रतिष्ठेचा दावा केला जात होता.

 

 

हवेली तालुका पंचायत समितीच्या उपसभापती पदासाठीची निवडणूक राजकीय नेतृत्त्वासाठी आव्हानात्मक ठरत आली आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने हाच पॅटर्न स्थानिक स्वराज संस्था निवडणुकांतही वापरला जात आहे. यातूनच शिवसेनेकडूनही महत्त्वाच्या पदांवर दावे केले जात आहेत. गेल्यावेळी उपसभापती पदासाठीच्या निवडणुकीत केवळ चिठ्ठीतून निवड प्रक्रिया घेण्यात आल्याने शिवसेनेवर अन्याय झाला होता. उपसभापतीपदाच्या निवडणुकीत अनेक रोमांचकारी घडामोडी घडल्या होत्या.

 

 

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी राष्ट्रवादीचाच उपसभापती व्हावा यासाठी तर दुसरीकडे भाजपचे आमदार भीमराव तापकीर यांच्यासह जि.प.सदस्य तथा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर कटके यांनी आपापल्या पक्षाचाच उपसभापती व्हावा यासाठी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत उपसभापतीसाठी राष्ट्रवादीकडून युगंधर काळभोर तर शिवसेनेच्या वतीने नारायण आव्हाळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तर भाजपकडून अनिल टिळेकर तर अनिरुध्द यादव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या निर्धारीत वेळेत भाजपच्या दोन्ही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने उपसभापतीपदासाठी चुरशीची निवडणूक झाली होती. प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पंचायत समिती महिला सदस्याने उघडपणे पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली तर भाजपचाच एक सदस्य मतदानाला गैरहजर राहिल्याने युगंधर काळभोर व नारायण आव्हाळे या दोघांना समान मते पडली. त्यामुळे चिठ्ठीद्वारे निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात युगंधर काळभोर यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने नारायण आव्हाळे यांची संधी हुकली होती. त्याचवेळी पुढील निवडणुकीत हवेली पंचायत सिमतीचा उपसभापती शिवसेनेचाच असेल, असा विश्वास व्यक्त करीत यासाठी शिवसेनेचे उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गरदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा प्रमख ज्ञानेश्वर कटके, रमेश कोंडे यांनी मोट बांधली होती.

 

 

दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांनी आदेश दिल्यामुळे उपसभापती युंगधर उर्फ सनी मोहन काळभोर यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर घेण्यात आलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्यावतीने उरूळीकांचन-शिंदवणे गणातील हेमलता बडेकर यांना संधी देण्यात आली. त्यावेळीही भाजपकडून अनिरुद्ध यादव हे बडेकर यांच्या विरोधात रिंगणात होते. यावेळी पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांत महाविकासआघाडीचा प्रयोग यशस्वी ठरला. शिवसेनेने राष्ट्रवादीला मदत केल्याने बडेकर यांना 16 मते मिळाली. उपसभापती पद भुषविलेल्या बडेकर या आमदार अशोक पवार यांच्या कट्टर समर्थक मानल्या जातात. त्यापूर्वीचे उपसभापती युगंधर काळभोर हे ही आमदार पवार यांचेच समर्थक मानले जातात. यातून हवेलीवर आपलेच वर्चस्व असल्याचे आमदार पवार यांनी दाखवून दिले होते. बडेकर यांच्यानंतर उपसभापती पदावरील दिनकर हरपळे यांच्या राजीनाम्यानंतर या पदावर शिवसेनेने दावा केला होता. वाघोली-आव्हाळवाडी गणातील नारायण आव्हाळे हे जिल्हा प्रमुख कटके यांचे समर्थक मानले जातात. त्यामुळे यावेळची उपसभापती पदाची निवडणूक ज्ञानेश्वर कटके यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. यामुळे उपनेते आढळराव पाटील यांच्या आदेशानुसार जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, हवेलीचे तालुका प्रमुख प्रशांत काळभोर यांच्यासह शिवेसेनेचे पदाधिकाऱ्यांना सोबत घेत कटके यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्ष नेतृत्त्व तसेच पदाधिकाऱ्यांशी यशस्वी चर्चा करीत यावेळी उपसभापती पद शिवसेनेकडे खेचून आणले. यामुळे हवेली पंचायत समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेचा उपसभापती होण्याचा मान नारायण आव्हाळे यांना मिळू शकला. या निवडणुकीत आपले समर्थक आव्हाळे यांना पदावर विराजमान करीत आपलेही वर्चस्व हवेलीवर असल्याचे जिल्हा प्रमुख कटके यांनी दाखवून दिले आहे.

 

सभापती पदावेळीही शिवसेनेची भूमिका ठरली होती निर्णायक…

हवेली पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीच्या उमेदवार हेमलता कांतिलाल काळोखे यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवार कावेरी विलास कुंजीर यांचा चिठ्ठीने पराभव केला होता. त्यावेळीही वेगवान राजकीय घडामोडी घडल्या होत्या. भाजपकडून सभापतीपदासाठी अश्विनी किशोर पोकळे यांना रिंगणात उतरविण्यात आल्यानंतर शिवसेनेकडून ललिता अनिल कुटे यांनी अर्ज दाखल केला होता परंतु कुटे यांना अर्ज माघारी घेण्यास सांगून शिवसेनेने राष्ट्रवादीच्या बंडखोर कावेरी कुंजीर यांना पाठिंबा देऊन चाल खेळली होती. सभापतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत आवाजी मतदानाने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार हेमलता काळोखे यांना 10 तर बंडखोर कावेरी कुंजीर यांना 10 मते मिळाली, समसमान मते मिळाल्याने चिठ्ठीद्वारे सभापती निवडण्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला त्यात राष्ट्रवादीच्या हेमलता कोळोखे यांना नशीबाने साथ दिली होती. त्यामुळे उपसभापती पदावर शिवसैनिकच असायला हवा, अशी मागणी शिवसैनिकांनी लावून धरली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.