हवेली, दौंडमधील पाणीयोजना कोरड्या

अनेक वाड्या-वस्त्यांवर टॅंकर सुरू : दूध संकलनाची आकडेवारी घटली

थेऊर – जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत वरुणराजाने हुलकावणी दिल्यामुळे नवीन मुठा उजवा कालव्यास खडकवासला धरणांमधून पाणी सोडणे बंद केल्यामुळे हवेली, दौंड व इंदापूर तालुक्‍यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. हवेली व दौंड तालुक्‍यातील कालव्याशेजारील असणाऱ्या गावातील पिण्याच्या पाणी पुरवठा योजना कोलमडल्या असून दिवसाआड पाणीपुरवठा करणेही मुश्‍किल झाले आहे.

विहिरींची पाण्याची पातळी आटल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला असून आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार अशी परिस्थिती झाल्याने हवेलीतील सधन समजल्या जाणाऱ्या गावांतील अनेक वाड्या वस्त्यांवर पाण्याचे टॅंकर सुरू आहेत. नागरिकांनी पिण्याचे पाण्यासाठी टाहो फोडला असून या भागातील पाण्याची पातळी खोल गेल्याने बळीराजा कासावीस झाला आहे. मात्र याही दुष्काळसदृश परिस्थितीत बेबी कॅनाल काही शेतकरी बांधवांचा आधार बनला आहे. मुठा उजवा कालव्यालगत पाझरद्वारे आसपासच्या विहिरींना, ओढ्यांना, नाल्याला व शेतीला मुबलक प्रमाणात पाणी असते; पण या कालव्यालाच पाणी सोडणे बंद केल्याने अनेक ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजना गुळण्या ओकू लागल्या आहेत. शेतीला पाणीपुरवठा करणे कठीण बनले आहे. कालव्याच्या पाझरद्वारे येथील विहिरींना व ओढ्यांना पाणी बंद झाल्याने व पावसाने अद्यापही हुलकावणी दिल्याने येथील पिके जून महिन्याच्या अखेरीस धोक्‍यात आली आहेत. पशुधन वाचवण्यासाठी चाऱ्याची कमतरता जाणवू लागल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. प्रामुख्याने हा भाग शेतीसाठी सुजलाम्‌ सुफलाम्‌ म्हणून ओळखलो जातो. या परिसरातील शेतीमधून उसाच्या पिकाबरोबर अनेक नगदी पिके व फळबागाचे उत्पादन घेतले जाते. त्याचप्रमाणे या भागातून मोठ्या प्रमाणावर दूध संकलित केले जाते. मात्र सद्यस्थितीत अनेक सहकारी दूध संस्थांची संकलनाची आकडेवारी घटल्याचे निदर्शनास आले आहे.

पूर्व हवेलीत सर्वाधिक फटका
हवेलीच्या पूर्व भागातील उरूळी कांचन, शिंदवणे, तरडे, वळती, कुंजीरवाडी, आळंदी- म्हातोबाची, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती व दौंड तालुक्‍यातील काही गावांमधील वाड्या वस्त्यांमध्ये पाणी पुरवठा योजना कार्यरत असून या योजना नवीन उजवा कालव्याच्या पाझरवर अवलंबून आहेत. या योजना कडक उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये विस्कळीत झाल्याने पिण्याचे पाणी या समस्येने गंभीर वळण घेतले आहे. दौंड शहर, कुरकुंभ औद्योगिक वसाहत, वरवंड पाणी पुरवठा योजना, इंदापूर शहर पाणी पुरवठा हया योजना नवीन उजवा कालव्यावर अवलंबून असल्यामुळे कालव्यामध्येच पाणी नसल्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा योजना गुळण्या ओकू लागल्या आहेत.

धरण क्षेत्रातील पाणीसाठा कमी झाल्याने व पुणे महानगरपालिका दररोज 1350 ते 1450 एमएलडी पाणी सर्व नियम मोडीत काढून उचलत असल्याने जलसंपदा विभागाला सद्यस्थितीत ग्रामीण भागाला कालव्यातून आवर्तनाद्वारे पाणी देणे अशक्‍य झाले आहे. गेल्या 9 महिन्यांपासून पुणे महानगरपालिकेने नियमानुसार पाणी उचलले असते तर किमान दोन टीएमसी पाणी वाचले असते. या वाचलेल्या पाण्यातून ग्रामीण भागासाठी आवर्तन देणे शक्‍य झाले असते. त्यामुुळे पूर्व हवेलीतील या गावांत पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली नसती; परंतु आता कालव्याचे आवर्ततन ही बाब अशक्‍यप्राय आहे.

यामुळेच जूनअखेर व जुलैच्या सुरुवातीलाच पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाल्याने पुढील काही दिवसांत ही बाब उग्र रूप धारण करण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.