हौस जुळ्यांची…

३१ मार्च आमच्या लग्नाचा आणि माझ्या नवऱ्याचा वाढदिवस एकाच दिवशी असतो हा दिवस म्हणजे डबल धमाका! दरवर्षी या दिवशी एक आठवण जरूर येते, कधीही विसरली जाणार नाही अशी. कारण दरवर्षी 31 मार्चनंतर 1 एप्रिल हा दिवस ओघाने येतोच. लहानपणी आणि आताही लोकांना फूल बनवायला तेवढेच आवडते नाही का?  कुणाला काय आवडेल त्याचा काही नेम नाही! मला नेहमी जुळे व्हावे असे वाटे! काहीही होवो पण जुळे व्हायला पाहिजे आता हसू येते पण त्यावेळी हे वेड डोक्‍यात होते. गोष्ट अशी माझ्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता आणि त्यावेळी नेमका मला सातवा महिना लागलेला होता. अतिलाडकी असल्याने नवरा माहेरी पाठवायला तयार नव्हता. त्याने सांगितले होते की मी काही बेबीला पाठवणार नाही. पण दुसऱ्या दिवशी 1 एप्रिल असल्याने त्याला काय हुक्‍की आली व म्हणाला, बेबी आपण तुझ्या ताई (आई) अण्णांना एप्रिल फुल करू. थोडी गंमत करू आणि पत्र लिहिण्यास बसला.

मलाही सामील करून घेतले. दोघांनी मिळून माझ्या आईवडिलांना पत्र लिहिण्यास सुरुवात केली आणि मजकूर लिहिला बेबीला (मला) जुळे झाले आहे. दोन्ही बाळं 5/5 पौंडांची आहेत आणि छान हेल्दी आहेत! बेबी पण सुखरूप आहे. आम्ही हॉस्पिटलमधून पत्र लिहीत आहोत. मी पण लिहिलं ताई काळजी करू नकोस. मी आणि माझी दोन्ही बाळं सुखरूप आहे. मी खूपच खूश आहे. मला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुलं झालीयेत !  आम्ही दोघांनीही पत्रावर सह्या करून पत्र पूर्ण केले आणि पोस्टात टाकले  आम्ही निव्वळ गंमत म्हणून, सहज मनात आले म्हणून हे केले आणि विसरूनही गेलो.  जसे माझ्या माहेरी पत्र मिळाले तसा तिकडे जल्लोष उडाला. (माझे माहेर सावंतवाडीला असल्याने पत्र पोहोचायला 2/4 दिवस लागत.) तिकडे जल्लोष उडून गावभर बातमी पसरली. पेढे बर्फी वाटली. सगळीकडून अभिनंदनाचा वर्षाव. त्यांना जो तो आजीआजोबा, मामा मावशी झाले म्हणून कौतुकाने चिडवू लागले. तुमच्या बेबीने बाजी मारली हो पहिल्याच फटक्‍यात आणि तेही एकदम सुपर फास्ट. सातव्या महिन्यात एकदम दोन दोन वा कमालच झाली. पुढे त्रासच नाही मस्तं इती.

माझ्या बहिणीने एका रात्रीत झबली टोपडी दुपटी जागून शिवली. दोन बाळांचं सगळा बाळंतविडा घेऊन आई तातडीने आली आणि आमच्या ध्यानीमनी नसताना दत्त म्हणून हजर झाली. आत आल्या आल्या मला समोर पाहून तिची प्रतिक्रिया काय सांगायची! ती एकच वाक्‍य बोलली, “कार्टे एवढ्या लांबून आले 13 तासांचा प्रवास करून, आता तुला घेतल्याशिवाय जाणार नाही. यांची गंमत चांगलीच अंगाशी आली त्यांच्याच! आता नाही न म्हणताच येणार नव्हते. अशा पद्धतीने मी सावंतवाडीत पोहोचले आणि माझी जुळी मुले बघायला जो तो येई… आणि कथा ऐकून प्रत्येकाची हसून हसून मुरकुंडी वळे…  माझी मैत्रीण मागदूने तिच्या भावाला पाठवले. त्याने जाऊन सांगितले तिला, मला मुले नाही दिसली; पण बेबी जाड झालीये. मग ती स्वतः आली आणि आम्ही दोघी किस्सा आठवून खूप वेळ हसत होतो.  या सगळ्या प्रकारात माझा नवरा पुरा फसला (बिच्चारा) माझा फायदा आणि त्याचे नुकसान झाले.  त्यानंतर 3 वेळा न्यायला आला पण त्याची डाळ शिजली नाही. आईने बिलकुल पाठवले  नाही. अशी ही एप्रिल फूलची कथा अजूनही दोन्ही परिवार चवीने ऐकवून आनंद घेत असतात एप्रिल फूल… आणि हो मला जुळं नाहीच झालं हो कन्यारत्न झालं! 25 जूनला.

अनुराधा पवार

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here