हॅटसन ऍग्रो प्रॉडक्टस् लिमिटेड ही प्रामुख्याने दक्षिणेकडील राज्यांमध्ये दूध, आईस्क्रीम आणि अन्य दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन आणि विक्री करणारी अग्रेसर कंपनी आहे. अरुण आईस्क्रीम, आरोक्य मिल्क, हॅटसन दही, पनीर, तूप, डेअरी व्हाईटनर इत्यादी. कंपनी जगभरातील 38 देशांमध्ये विविध उत्पादने निर्यात करते. त्यामध्ये प्रामुख्याने अमेरिका आणि आशियातील देशांचा समावेश होते. आर. जी. चंद्रमोगन यांनी मार्च 1986 मध्ये या कंपनीची स्थापना केली.
जानेवारी 1996 मध्ये ही कंपनी शेअरबाजारात दाखल झाली. आधी कंपनीचे नाव हॅटसन मिल्क फूड लिमिटेड असे होते. 7 एप्रिल 1998 पासून कंपनी हॅटसन ऍग्रो प्रॉडक्टस् या नावाने ओळखली जाऊ लागली. उच्च दर्जाची दुग्धजन्य उत्पादने तयार करून शेतकऱ्यांबरोबरच ग्राहकांचेही जीवन समृद्ध करण्याची बांधिलकी मानून कंपनी गेली अनेक वर्षे यशस्वीपणे वाटचाल करत आहे.
चेन्नई येथे मुख्यालय असलेली ही कंपनी रोज सुमारे चार लाख शेतकऱ्यांकडून जवळपास 33 लाख लिटर दूध गोळा करते. त्यासाठी कंपनीकडे दहा हजार मिल्क बॅंकेची यंत्रणा आहे. हॅटसन ब्रॅंडखाली दही, गोड दही, गायीचे दूध, पनीर, योगर्ट, चीज स्प्रेड, तूप, टेबल बटर, कुकिंग बटर, डेअरी व्हाईटनर, स्किम्ड मिल्क पावडर, लस्सी, ताक अशी अनेक उत्पादने प्रामुख्याने तमिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात विकली जातात. त्याचबरोबर आरोक्य मिल्क, अरुण आईस्क्रीम, ईबॅको आईस्क्रीम केक्स, आईस्क्रीम बार, सिग्नेचर कोन चॉकलेटस्, सॅंतोसा विटामिनयुक्त पशुखाद्य, ओयालो प्युअर व्हेज पिझ्झा हे कंपनीचे प्रमुख ब्रॅंड आहेत.
आरोक्य मिल्क हा ब्रॅंड गेली पंचवीस वर्षे दक्षिणेकडील राज्यांमध्ये प्रसिद्ध आहे. स्वयंपाकासाठी लागणारी तसेच खाण्यासाठीची अनेक उत्पादने कंपनी बनवते. त्यामुळेच आज कंपनीची 96.23 टक्के विक्री ही केवळ ग्राहकांच्या बळावर होत आहे. गुणवत्तापूर्ण उत्पादने ग्राहकांना देण्याच्या बांधिलकीमुळे कंपनीच्या 17 प्रकल्पांमध्ये आज त्यासाठीची तंत्रज्ञानाधारीत अत्याधुनिक यंत्रणा आहे.
दूध व दुग्धजन्य पदार्थांची अनेक कुटुंबाची गरज भागवण्यासाठी कंपनी नव्या बाजारपेठेच्या शोधात सातत्याने असते. त्यादृष्टीने आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्रात विस्ताराचे कंपनीचे प्रयत्न सुरू आहेत. कंपनीने आराक्य मिल्क हा ब्रॅंड 1995 मध्ये आणला आणि आज तमिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो ग्राहकांमध्ये हा ब्रॅंड लोकप्रिय आहे. आरोक्य मिल्कबरोबरच स्टॅंडर्डडाइज्ड मिल्क, फुल क्रीम मिल्क, टोन्ड मिल्कही आरोक्य ब्रॅंडअंतर्गत विकले जाते.
शेतकऱ्यांनी दूध काढल्यापासून केवळ अर्ध्या तासात ते हॅटसन मिल्क बॅंकेत पोहोचलेले असते. 12000 खेड्यांमध्ये अशा मिल्क बॅंकेची रचना अस्तित्वात आहे. मिल्क बॅंकेतून लगेचच तीस किलोमीटरच्या अंतरात असलेल्या चिलिंग सेंटरमध्ये हे दूध पोहोचते. त्यामुळे दूध काढल्यानंतर अल्पावधीतच ते 5 अंश सेल्सियस तापमानाच्या खाली साठवणे शक्य होते.
चिलिंग सेंटरमधून हे दूध पुढे शंभर किलोमीटर अंतराच्या आत असलेल्या डेअरीकडे इन्सुलेटेड टॅंकरमधून रवाना होते. तेथून पॅकिंग होऊन ते विविध ठिकाणी पाठवले जाते. शेतकऱ्यांकडून जमा करण्यात आल्यानंतर दूध ग्राहकांच्या हाती पोहोचेपर्यंत दुधाच्या 45 वेगवेगळ्या चाचण्या केल्या जातात. ग्राहकांना ताजे दूध मिळावे म्हणून कंपनीकडे दूध वितरणाची भक्कम व्यवस्था आहे. त्यासाठी तमिळनाडू, कर्नाटक, गोवा आणि आंध्र प्रदेशच्या काही भागात कंपनीचे इन्सुलेटेड टॅंकर प्रतिदिन 2,00,000 किलोमीटरचा प्रवास करतात.
अरुण आईस्क्रीमची विविध राज्यांमध्ये सुमारे 2305 पार्लर आहेत. त्यासाठी 14 महत्त्वाच्या ठिकाणी कोल्ड रुम डिस्ट्रिब्युशन सेंटर्स आहेत. दूध, दही विक्रीसाठी 650 डिलर आणि 1400 विक्री केंद्रांची व्यवस्था कंपनीकडे आहे. कंपनीचे बारा प्रकल्प तमिळनाडूत, एक तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात, एक आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात, कर्नाटकात बेळगाव आणि दावणगेरेजवळील होन्नाळी येथे तसेच महाराष्ट्रातील सांगोल्यात कंपनीचा प्रकल्प आहे. नोव्हेंबर 2013 पासून कंपनीने शेतकऱ्यांना देण्यात येणाऱा मोबदला डिजिटल पेमेंटद्वारे देण्यास सुरुवात केली आणि ऑक्टोबर 2015 पासून आता 100 टक्के शेतकऱ्यांना डिजिटल पेमेंटद्वारे मोबदला दिला जातो.
गेल्याच महिन्यात कंपनीच्या संचालक मंडळाने 1:3 प्रमाणात बोनस शेअर देण्यास मंजुरी दिलेली आहे. सप्टेंबर 2020 मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीची कामगिरी लक्षणीयरित्या सुधारलेली आहे. गेल्यावर्षी या तिमाहीत कंपनीला 25.24 कोटी रुपये निव्वळ नफा झालेला होता. त्यामध्ये यंदा वाढ होऊन तो तब्बल 65.79 कोटी रुपयांवर पोचलेला आहे. कंपनीच्या उलाढालीत 3.79 टक्क्यांनी वाढ होऊन ती 1278.55 कोटी रुपयांवर पोहोचलेली आहे. गेल्या पाच वर्षांत कंपनीच्या शेअरने 222.7 टक्के परतावा दिलेला आहे.
आर.जी. चंद्रमोगन
कंपनीच्या प्रगतीमध्ये 71 वर्षीय अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आर.जी. चंद्रमोगन यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न कारणीभूत आहेत. त्यांच्या डोक्यात सतत आकडेवारी सुरू असते. अगदी संगणकाप्रमाणे. गंमत म्हणजे एकेकाळी प्री-युनिव्हर्सिटी कोर्सच्या परीक्षेत काही मिनिटाचा गणिताची प्रश्नपत्रिका तशीच ठेवून ते बाहेर पडले होते. त्यावेळी त्यांचे कुटुंबीय मोठ्या आर्थिक संकटातून जात होते. त्यांच्या वडिलांचे छोटे प्रोव्हिजन स्टोअर बंद पडले होते. या सगळ्या घुसळणीतून जात असतानाच आता आपल्याला स्वतःचा मार्ग स्वतःला तयार करायचा आहे हे त्यांनी ठरवले आणि वडिलांकडून बीजभांडवल म्हणून 13 हजार रुपये घेऊन आईस्क्रीम कॅंडीची फॅक्टरी सुरू केली. आज त्यांची संपत्ती सुमारे 1.3 अब्ज डॉलर असून भारतातील पहिल्या शंभर श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश होतो.
शुक्रवारचा बंद – रु. 943 (एनएसई)
– सुहास यादव