मिलिंद सोमण या अभिनेत्याला बॉलीवूडमध्ये कलाकार म्हणून फारसे बस्तान बसवता आले नसले तरी प्रसिद्धी फोकस मात्र नेहमीच त्याच्याभोवती राहिला. याचे मुख्य कारण म्हणजे मिलिंदची स्टाईल आणि सर्वांत महत्त्वाचा म्हणजे त्याचा फिटनेस. नुकत्याच संपलेल्या दिवाळीच्यानिमित्ताने मिलिंदने अनोख्या पद्धतीने प्रेक्षकांना शुभेच्छा दिल्या. त्याने इन्स्टाग्राम अकौंटवर धोती आणि चप्पल परिधान करून धावतानाचा फोटो टाकून हॅप्पी दिवाळीचा संदेश पोस्ट केला आहे. धोती परिधान करून मिलिंदने 25 किलोमीटर रनिंग केले आहे.
यापूर्वीही मिलिंद अनवाणी पायांनी धावला आहे. 2017 मध्ये 517 किलोमीटरचे फ्लोरिडा अल्ट्रामॅन चॅलेंज ट्रायथलॉन यशस्वीपणे पूर्ण केले आहे. या स्पर्धेमध्ये 423 किलोमीटर सायकलिंग, 10 किलोमीटर पोहणे आणि 84 किलोमीटर धावणे यांचा समावेश होता. ही सर्व स्पर्धा त्याने अनवाणी पायाने पूर्ण केली होती.
मिलिंद आणि त्याची 28 वर्षीय पत्नी नेहमीच अशा प्रकारची खडतर आव्हाने स्वीकारत असतात आणि पूर्ण करत असतात. अलीकडेच आईसलॅंडमध्ये सुट्ट्या एंजॉय करून हे कपल परतले आहे. मिलिंदच्या वयाच्या मानाने त्याचा असलेला फिटनेस सर्वांनाच अचंबित करणारा राहिला आहे. आताही त्याने 25 किमी धावून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.