हाथरस : अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल

देशद्रोह, जातीय संघर्षाचा कट रचल्याच्या आरोपांचा समावेश

गुन्हेगारी स्वरूपाचा व्यापक कट असल्याचा दावा

हाथरस – उत्तरप्रदेशातील हाथरस प्रकरणाच्या वादग्रस्त हाताळणीवरून टीकेचे धनी बनलेल्या स्थानिक पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये देशद्रोह, जातीय संघर्षाचा कट रचणे आदी 19 आरोपांचा समावेश करण्यात आला आहे.

हाथरसमधील युवतीवरील कथित सामूहिक बलात्कार आणि तिच्या हत्या प्रकरणाने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. ते प्रकरण हाताळण्यावरून पोलीसही वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. अशातच पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याची माहिती पुढे आली आहे. त्यामध्ये गुन्हेगारी स्वरूपाचा व्यापक कट रचण्यात आल्या दावा करण्यात आला आहे.

सध्याच्या स्थितीचा गैरफायदा घेऊन कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी विशिष्ट समुदायाला भडकावण्याचा डाव त्या कटाद्वारे काही समाजविरोधी घटकांनी रचला आहे. उत्तरप्रदेश सरकारची प्रतिमा मलिन करणे हाही त्यामागील हेतू आहे, असे गुन्हा नोंदवताना नमूद करण्यात आले आहे.

पीडितेच्या कुटूंबीयांनी सरकारविरोधात बोलावे यासाठी त्यांना आरोपींनी 50 लाख रूपयांचे आमीष दाखवले. वृत्तवाहिनीशी सरकारविरोधात बोलण्यासाठी पीडितेच्या कुटूंबीयांवर एका अज्ञात पत्रकाराने दबाव टाकला, असा उल्लेखही गुन्हा नोंदवताना करण्यात आला आहे.

उत्तरप्रदेशात एकूण 19 गुन्हे दाखल

हाथरस पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याप्रमाणे एकूण 19 गुन्हे संपूर्ण उत्तरप्रदेशात दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये हाथरस जिल्ह्यातील 6 गुन्ह्यांचा समावेश आहे. तर, उत्तरप्रदेशच्या इतर भागांत पोलिसांनी 13 गुन्हे दाखल केले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.