हॅटट्रिक : सातारा लोकसभा मतदारसंघ

निकालाच्या आधीच जल्लोष
सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजे यांचे लीड 75 हजारांवर स्थिरावताच एमआयडीसी गोडावूनच्या बाहेर बसलेल्या राजे समर्थकांनी साताऱ्यात धाव घेतली. दुपारी तीन वाजता तळपत्या उन्हात फटाक्‍यांची आतीषबाजी सुरू झाली. देवी चौक, मोती चौक, 501 पाटी येथे एकच जल्लोष व फटाक्‍यांची आतषबाजी थांबता थांबेना. काहींना महाराज निवडून आल्याचा साक्षात्कार झाला. काही उत्साह मूर्तींनी दैनिकाच्या कार्यालयात फोन करून मताधिक्‍य की विजय याची खात्री करून घेतली. साताऱ्यात जल्लोष सुरू असताना सातारा विकास आघाडीचा एकही सदस्य रस्त्यावर दिसला नाही.

भाजपचे लाडू वाटप
एक्‍झिट पोलचे बहुमताचे अंदाज प्रत्यक्ष मतामध्ये रूपांतरित झाल्यावर साताऱ्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. एनडीएने देशभरात साडेतीनशे जागांचा टप्पा ओलांडल्यानंतर तो आनंद साजरा करण्यासाठी साताऱ्यात चक्क लाडू वाटप करण्यात आले. मोती चौक व राजवाडा परिसरात भाजपचे गटनेते मिलिंद काकडे, धनंजय जांभळे, विजय काटवटे, सिद्धी पवार, प्राची शहाणे, आशा पंडित, ऍड. प्रशांत खामकर विठ्ठल बलशेटवार या सदस्यांनी एकत्र येऊन जल्लोष केला. नागरिकांना स्वतः नगरसेवकांनी लाडू भरवले. सातारा शहरात बहुतांश ठिकाणी लाडवाचे मोठ्या प्रमाणात वाटप झाले. भाजपच्या प्रेमळ गोडव्याची साताऱ्यात जोरदार चर्चा होती.

उन्हाच्या तडाख्याने वैतागले कार्यकर्ते
सातारा व माढा लोकसभा मतदार संघाचा निकाल ऐकण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांची रणरणत्या उन्हामुळे मोठी गैरसोय झाली. विविध राजकीय पक्षांसाठी ठरवून दिलेल्या जागेवर कार्यकर्ते अभावानेच आढळून येत होते. अनेक जणांनी तर आपल्या चारचाकी वाहनातच बसून निकाल ऐकण्यास प्राधान्य दिले. फेडरेशन गोडावून पासून शंभर मीटर अंतरावर वायफाय झोनची व्यवस्था होती. तसेच पाऊण किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वाहनतळावर झाडांचा आडोसा शोधून कार्यकर्त्यांनी तिथेच पथारी मांडली. रणरणत्या उन्हाच्या तडाख्याने काहींनी चारचाकी वाहनात बसून छान वातानुकूलन यंत्रणेचा आनंद घेतला.

साताऱ्यात रंगत तर माढ्यात टोकदार संघर्ष
सतराव्या लोकसभा निवडणुकांमध्ये पश्‍चिम महाराष्ट्रातील दहा जागांपैकी सातारा व माढा या दोन मतदारसंघात भाजप व राष्ट्रवादी यांच्यात कडवी टक्कर पहायला मिळाली. पाच वर्षापूर्वी 3 लाख 67 हजार मतांचे मताधिक्‍य घेणाऱ्या उदयनराजेंना यंदाच्या लढतीत लाखाच्या आसपास मताधिक्‍यावर समाधान मानावे लागले. माढ्यात तर प्रत्येक फेरीनिहाय दोन हजार ते आठ हजार या दरम्यानच्या अंतराने भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर व राष्ट्रवादीचे संजय मामा शिंदे यांच्यात आघाडी पिछाडीचा खेळ सुरू होता. मावळमध्ये जसा अजितदादांना जो झटका मिळाला त्याचीच पुनरावृत्ती माढ्यात करून थोरल्या पवारांना आस्मान दाखवण्याची भाजपची स्पष्ट रणनिती होती. तशी यंत्रणा व कुमकही त्यांनी लावत माढ्याची जागा प्रतिष्ठेची केली होती. साताऱ्यात प्राथमिक फेरीत उदयनराजेंच्या पिछाडीच्यावृत्ताने क्षण मात्र राजे प्रेमींच्या काळजाचा ठोका चुकला होता. मात्र राजेंनी सकाळी नऊ ते दीड या साडेचार तासात आपले लीड साडेचार हजारापासून वाढवत पन्नास हजारापर्यंत वाढवत नेले. तरीसुध्दा नरेंद्र पाटलांच्या मिशीचा पीळ कायम होता. जिंकणार मीच आणि मी घडवणाऱ्या परिवर्तनाला सातारकर साथ देणार
अशी प्रसार माध्यमांना नरेंद्र पाटील यांनी प्रतिक्रियासुध्दा
देऊन टाकली.

माढ्यात जोरदार राजकीय हेलकावे
राष्ट्रवादी व भाजप या दोन्ही पक्षांनी माढ मतदारसंघाची जागा विलक्षण प्रतिष्ठेची केली होती. पश्‍चिम महाराष्ट्रातल्या दहा जागांमध्ये माढा मतदारसंघात प्रत्येक मतांची झालेली प्रचंड रस्सीखेच चर्चेचा विषय ठरली. या मतदारसंघात तब्बल 31 उमेदवार रिंगणात होते. रणजितसिंह, संजय मामा यांच्यासह वंचितकडून ऍड. विजय मोरे रिंगणात होते. तब्बल बारा लाख अकरा हजार मतदारांनी माढ्याला कौल दिला. दहा वर्षापूर्वी मतदारसंघाची झालेली पुनर्रचना शरद पवारांनी येथून केलेले प्रतिनिधित्व तरीही सिंचन व पुनर्वसनाचे प्रलंबित प्रश्‍न या गोष्टी हेरून भाजपने कॉंग्रेसच्या रणजितसिंह निंबाळकरांना गळाला लावले आणि ही राजकीय चाल यशस्वी ठरल्याचे या निकालांवरून दिसत आहे. राजकीय अंदाजांना माढ्यात प्रचंड हेलकावे पहायला मिळाले. संजय मामा विरूद्ध रणजितसिंह ही लढत खऱ्या अर्थाने कॉंटे की टक्कर ठरली.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)