सातारा -साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची बुधवारी तडकाफडकी बदली करण्यात आली. आता त्यांच्या जागी सांगली जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी पदभार स्विकारणार आहेत. जिल्हाधिकारी जयवंशी यांना महाबळेश्वर येथील अतिक्रमणे व मॅप्रो गार्डन नोटीसही प्रकरणे भोवल्याची चर्चा आहे.
दहा वरिष्ठ प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश बुधवारी मंत्रालयातून जाहीर झाले. यामध्ये सांगली जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी जितेंद्र डुडी यांची सातारा जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. मात्र जयवंशी यांच्या बदलीसंदर्भात कोणतेही तपशील देण्यात न आल्याने त्यांची बदली राखीव ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. जुलै 2022 मध्ये रुचेश जयवंशी यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला होता. सर्वसामान्यांचे प्रश्न समजावून घेणारे
जयवंशी अनेक प्रश्नांवर सामोपचाराने मार्ग काढत होते. मात्र पश्चिम भागातील महाबळेश्वर, पाचगणी, कास येथील अवैध बांधकामे, मॅप्रो गार्डनबाबत घेतलेली कडक भूमिका यामधून त्यांना राजकीय नाराजी भोवल्याची चर्चा आहे. जिल्हा नियोजन समितीकडून सर्व विभागांना जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अवघ्या 15 महिन्यात जिल्ह्यात पायभूत सुविधांचा विकास, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून विकासकामांचे बळकटीकरण करण्यावर त्यांनी भर दिला. तर राज्य शासनाचा कार्यक्षम जिल्हाधिकारी पुरस्कार मिळवणाऱ्या जयवंशी यांची 48 तासाच्या आत राज्य शासनाने बदली केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
आज सायंकाळी जिल्हा प्रशासनाला जयवंशी यांच्या बदलीचे आदेश प्राप्त झाले.2016 च्या प्रशासकीय बॅचच्या जितेंद्र डुडी यांनी डीआयपीपी विभागाचे सहाय्यक आयुक्त म्हणूनही काम पाहिले आहे. सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी गेल्या दोन वर्षात कार्यक्षम अधिकारी असा लौकीक मिळविला आहे. लवकरच ते साताऱ्यात येऊन पदभार स्वीकारणार असल्याचे सांगण्यात आले.
====================