जोहान्सबर्ग – दक्षिण आफ्रिकेचा अव्वल दर्जाचा फलंदाज हाशिम अमलाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला आहे. मात्र टी-20 च्या व्यावसायिक लीगमधील त्याचा सहभाग कायम राहणार आहे.
अमला या 36 वर्षीय खेळाडूने 124 कसोटीत 46.64 च्या सरासरीने 9 हजार 282 धावा केल्या. त्यामध्ये त्याने चार द्विशतकांसह 28 शतके ठोकली. 2012 मध्ये त्याने इंग्लंडविरूद्ध नाबाद 311 धावा करीत वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या नोंदविली. त्याने एक दिवसाच्या 181 सामन्यांमध्ये 8 हजार 113 धावा केल्या. त्यामध्ये त्याने 27 शतके केली. टी-20 च्या 44 सामन्यांमध्ये त्याने भाग घेतला. त्यामध्ये त्याने 8 अर्धशतकांसह 1 हजार 277 धावा केल्या.