क्रिकेट काॅर्नर : विचारांची पातळीही खालावली आहे का?

– अमित डोंगरे

बीसीसीआय जागतिक क्रिकेटमधील सर्वांत श्रीमंत क्रिकेट मंडळ अशी ओळख मिरवते. मात्र, श्रीलंकेत सध्या सुरू असलेल्या टी-20 सामन्यांच्या मालिकेत मंडळ केवळ आर्थिक फायद्यासाठी काय वाट्टेल ते करत असल्याने आता त्यांच्या आचारासह विचारांचीही पातळी खालावल्याचे दिसत आहे.

कृणाल पंड्या करोनाबाधित झाल्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या तब्बल आठ खेळाडूंना या मालिकेतून अंग काढून घ्यावे लागले. या खेळाडूंना विलगीकरणातही पाठवले गेले. मात्र, इतके होऊनही उर्वरित दोन्ही सामने रद्द झाले नाहीत. हे सामने खेळण्याच्या अट्टहासापायी संघाबरोबर असलेले नेट गोलंदाजही प्रत्यक्ष 11 खेळाडूंमध्ये खेळण्यासाठी तयार केले गेले. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी इंग्लंड संघातील काही खेळाडू असेच करोनाबाधित आढळले होते. मात्र, त्यांनी सेकंड बेंच इतका मजबूत बनवला की हाच प्रमुख संघ असल्यासारखा खेळला.

इथे मात्र, बीसीसीआयने मुळात एका संघाचे दोन संघ करत एका संघाला इंग्लंडला पाठवले आहे, तर दुसरा संघ श्रीलंकेत खेळत आहे. मग श्रीलंकेत करोनाबाधित खेळाडूंच्या जागी आणखी पर्यायी खेळाडू कसे आणायचे हा प्रश्‍न निर्माण झाला. कोणतीही अडचण चुटकीसरशी सोडवण्याची खासियत असलेल्या बीसीसीआयने शक्कल लढवली व संघासह असलेले नेट गोलंदाजही खेळण्यासाठी उपलब्ध करण्यात आले.

ज्या खेळाडूंना प्रमुख संघात कधीही स्थान मिळाले नसते त्यांनाही पदार्पणाची संधी दिली गेली. मालिका रद्द करण्याऐवजी खेळाडूंची अदलाबदल करण्याची वेळ यापूर्वी जगातील कोणत्याही संघावर आली नसावी. पैशांसाठी हपापलेल्यांना खेळाडूंच्या जिवाशी काहीही देणे-घेणे नाही हेच यातून दिसून येते. बरे, संघ तयार झाला पण त्याचा दर्जा काय हा प्रश्‍नही विचारला जातोच की. संघात कर्णधार शिखऱ धवन, देवदत्त पडिक्‍कल, ऋतुराज गायकवाड, भुवनेश्‍वर कुमार, संजू सॅमसन व कुलदीप यादव हेच अनुभवी बाकी नवे असा समतोल साधून संघ तयार करण्यात आला आहे अशी मखलाशीही केली गेली.

आगामी मोसमातील व्यस्त वेळापत्रक पाहून विविध खेळाडूंना सातत्याने संधी दिली गेली पाहिजे असे सांगत असलेल्या राहुल द्रविडचे चक्क हातातील खेळणे बनवले गेले. त्याने या सर्व घडामोडींमध्ये एकही शब्द उच्चारलेला नाही याचेही आश्‍चर्य वाटते. याच द्रविडला रवी शास्त्रींच्या जागी भारतीय संघाचा प्रमुख प्रशिक्षक बनवण्याची सुरू असलेल्या मागणीचा श्रीलंकेत विनोद केला गेला हे आता क्रिकेटप्रेमींच्या लक्षात आलेच असेल. जर निर्णयाचे अधिकार द्रविडलाही देण्यात येणार नसले तर शास्त्री काय किंवा द्रविड काय एकाच नाण्याच्या दोन बाजू ठरतील.

असो, आता काय ही मालिका तर संपली पण त्यानंतर अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. मुळात ज्या संघातील इशान किशन, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, सूर्यकुमार यादव व पृथ्वी शॉ यांनाही आगामी टी-20 मालिकेत अंतिम 11 खेळाडूंमध्ये संधी मिळेल की नाही हे सांगता येत नाही, त्यांना घेऊन श्रीलंकेत मालिका का खेळवली गेली. करोनाचा धोका खेळाडूंपर्यंत येऊनही मालिका रद्द का केली गेली नाही. खेळाडूंना खेळवण्याचा व त्यांच्या जिवाशी खेळ करण्याचा हा अट्टहास कशासाठी. या विषाणूचे लोण पुन्हा एखदा वाढवण्याचा प्रताप बीसीसीआयने का केला हे व असे अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत, पण त्यांची उत्तरेही कधीही मिळणार नाहीत हेदेखील सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ दिसत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.