चंडीगढ – हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते भुपिंदरसिंह हुडा इंधन दरवाढीच्या विरोधातील ट्रॅक्टर मोर्चामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मोर्चावेळी कॉंग्रेसच्या महिला आमदारांनी ओढलेल्या ट्रॅक्टरवर विराजमान झाल्याने हुडा यांच्याकडून हरियाणा महिला आयोगाने स्पष्टीकरण मागवले आहे.
हुडा यांच्या नेतृत्वाखाली 8 मार्चला ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. त्या मोर्चातील ट्रॅक्टरला कॉंग्रेस नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दोरांनी बांधून खेचले. त्यासाठी महिला आमदारही पुढे सरसावल्या. मोर्चाच्या दिवशी जागतिक महिला दिन होता. त्यामुळे हुडा सत्तारूढ भाजपच्या टीकेचे धनी बनले आहेत. अशातच महिला आयोगाने हुडा यांना पत्र पाठवून तीन दिवसांत स्पष्टीकरण मागवले आहे.
हुडा यांनी जागतिक महिला दिनी महिलांचा अनादर करणारे कृत्य केले. त्याबद्दल कारवाई का केली जाऊ नये, अशी विचारणा पत्रातून करण्यात आली आहे. भाजपच्या टीकेला ट्रॅक्टर ओढणाऱ्या कॉंग्रेसच्या एका महिला आमदाराने याआधीच प्रत्युत्तर दिले आहे. हुडा आमचे नेते असून आम्हाला पितासमान आहेत. आमची कुठली तक्रार नसताना इतरांना काय समस्या आहे? आम्ही महिला असलो तरी स्वत:ला पुरूषांपेक्षा कमी लेखत नाही, असे त्या महिला आमदाराने म्हटले होते.