बालक फेकलेल्या बेजबाबदार मातेच्या मागावर पोलिस
कैथाल (हरियाणा) – हरियाणातील कैथाल जिल्ह्यात एका मातेने आपल्या नवजात बालकाला नाल्याच्या बाजूला फेकून पोबारा केला. मात्र, या बालकाचा आक्रोश ऐकून दोन श्वानांनी या बालकाला कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढले.आता या बालकावर इस्पितळात उपचार चालू आहेत तर पोलीस या बालकाच्या मातेचा शोध घेत आहेत.
ज्या महिलेने हे मूल प्लॅस्टिक मध्ये गुंडाळून फेकून दिले त्या महिलेची ओळख पटण्यास सोपे जाणार आहे. कारण सीसीटीव्हीमध्ये या महिलेचे फुटेज उपलब्ध आहे. हा प्रकार शनिवारी सकाळी 4 वाजता घडला. सीसीटीव्ही फुटेजनुसार एक महिला डोग्रा गेटजवळील नाल्याजवळ आली आणि तिने मूल फेकून दिले. या मुलाने रडायला सुरुवात केल्यानंतर या परिसरातील श्वानांनी तिकडे धाव घेतली. नंतर त्यांनी बालकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यानच्या काळात नजीकच्या नागरिकांनी तिकडे धाव घेतली. आता या बालकाला नागरी रुग्णालयात दाखल केले असून उपचार चालू आहेत. या बालकाची परिस्थिती गंभीर आहे.
उपचारानंतर बालकाला राष्ट्रीय बाल हक्क आयोगाकडे सोपविण्यात येणार आहे. पोलिसांनी सांगितले की नाल्याच्या परिसराची तपासणी करण्यात येत आहे. सीसीटीव्हीच्या आधारावर महिलेची ओळख पटविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. महिलेला ताब्यात घेतल्यानंतर तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल होईल.
या आठवड्याच्या सुरुवातीला गाजियाबाद जिल्ह्यात एका नवजात मुलाला फेकून दिल्याची घटना घडलेली आहे. त्यावेळी श्वानांनी जोरदार आवाज केल्यानंतर एका महिलेने त्या मुलाला वाचविले होते. त्या मुलावर उपचार चालू आहेत.