गावच्या यात्रेतील कुस्त्या प्रसिद्ध; दोन दिवसाचा उत्सव
वरवंड- पाटस (ता. दौंड) गावचे ग्रामदैवत श्री नागेश्वर महाराज यांचा यात्रोत्सव मंगळवार (दि.12) आणि बुधवारी होणार आहे. या यात्रेतील कुस्ती आखाडा राज्यभरात प्रसिद्ध आहे. नामांकित मल्लांच्या कुस्ती या ठिकाणी होत असून यावर्षी पाटस गावच्या यात्रेत माऊली जमदाडे विरुद्ध हरियाणाचा मल्ल मोहित कुमार आखाड्यात उतरणार आहे. तर, दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती संतोष सुतार विरुद्ध समीर देसाई यांच्यात होणार आहे. तर, तृतीय क्रमांकाची कुस्ती उमेश शिरतोडे यांच्या विरोधात हरिणाचा मल्ल विशाल कुमार यांच्या होणार आहे. तसेच, नामदेव कचरे विरुद्ध अर्जुन साठे, विकास बंडगर विरुद्ध संतोष पडळकर, दादा मुलाणी विरुद्ध सचिन चव्हाण अशा प्रमुख लढती होणार असल्याचे यात्रा कमिटीच्यावतीने सांगण्यात आले.
पाटस येथे दोन दिवस चालणाऱ्या यात्रेसाठी पाटस गाव सज्ज झाले आहे. श्री नागेश्वर महाराजांच्या मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिर परिसर स्वच्छ करुन सुशोभित करण्यात आला आहे. पाटस गावचे ग्रामदैवत श्री नागेश्वर महाराज यांची यात्रा मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. यात्रोत्सव असल्याने गावात उत्साहाचे वातावरण आहे. पाटस परिसरातील लोक यात्रेसाठी आवर्जून येतात. दरवर्षी प्रमाणेच यात्रेला पै-पाहुणे यांनी हजेरी लावली असून पाटसची बाजारपेठ फुलुन गेली आहे.
मंगळवारी यात्रेच्या पहिल्या दिवशी पहाटे लघुरुद्राभिषेक आणि नागेश्वर महाराजांची महाआरती त्यानंतर संध्याकाळी ढोल-ताशे वाजवत, फटाक्यांची आतषबाजी करीत नागेश्वर महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. संपूर्ण ग्रामप्रदक्षिणा पूर्ण करुन पालखी मंदिरात आणली जाणार आहे. तर, बुधवारी सकाळी लोकनाट्य तमाशा असून संध्याकाळी तीन वाजण्याच्या सुमारास जंगी कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन करण्यात आले आहे.