ज्येष्ठ आमदाराने दिला उपाध्यक्षपदाचा राजीनामा
चंडीगढ : हरियाणात सत्तेवर असणाऱ्या आणि वर्षभरापूर्वीच स्थापन झालेल्या जननायक जनता पक्षाला (जेजेपी) बंडाची लागण झाली आहे. जेजेपीच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत ज्येष्ठ आमदार रामकुमार गौतम यांनी बुधवारी पक्षाच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
जेजेपीमध्ये काहीच योग्य घडताना दिसत नाही. पक्षाच्या कामकाजाच्या पद्धतीमुळे मी निराश झालो आहे, असे 73 वर्षीय गौतम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. हरियाणाचे उपमुख्यमंत्री आणि जेजेपीचे अध्यक्ष दुष्यंत चौटाला यांच्यामुळेच आमदार बनल्याचे वक्तव्य गौतम यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्याबाबत पत्रकारांनी विचारल्यावर ते उत्तरले, होय ते खरे आहे.
पण, पक्षाच्या आमदारांमुळेच उपमुख्यमंत्री बनू शकलो याची जाणीव दुष्यंत यांनीही ठेवावी. जेजेपीला यश मिळावे यासाठी आम्ही खूप कष्ट घेतले, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. बंडाचे निशाण फडकावणाऱ्या गौतम यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा कुठलाही विचार नसल्याचेही स्पष्ट केले.
मागील वर्षी स्थापन झालेल्या जेजेपीचे 10 आमदार आहेत. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत हरियाणात त्रिशंकू स्थिती निर्माण झाली. विधानसभेच्या एकूण 90 पैकी 40 जागा जिंकत भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला. मात्र, सत्ता राखण्यासाठी भाजपला जेजेपीशी युती करावी लागली.