हरियाणा सरकारला केवळ बबिताचीच काळजी

धावपटू मनजिंतसिंग चहलची टीका

नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर लगेचच हरियाणा राज्य सरकारने कुस्तीपटू बबिता फोगट हिची राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या उपसंचालकपदी नियुक्ती केली आहे. मात्र, राज्याचा अव्वल धावपटू मनजिंतसिंग चहल याने राज्य सरकारवर टीका करताना सरकारला केवळ बबिताचीच काळजी आहे का, असा सवाल केला आहे.

आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकूनही माझ्यासारख्या अनेक खेळाडूंना राज्य सरकारने नोकरी देखील दिली नाही. बबिताला तातडीने नियुक्त करण्यात आले. मात्र, राज्याला तसेच देशाला पदक जिंकून देत असलेल्या खेळाडूंबाबत असा दुजाभाव का, असा सवालही त्याने केला आहे.

या पदावर एक महिला खेळाडू नियुक्त होणे ही चांगली गोष्ट आहे. मात्र, त्यापूर्वी ज्या खेळाडूंनी राज्याचे नाव उंचावले त्यांच्याकडे सोइस्कर दुर्लक्ष का करण्यात येत आहे? आता मी आगामी टोकियो ऑलिम्पिकची तयारी करू का सरकारकडे नोकरी देण्यासाठी तगादा लावू, अशा शब्दात त्याने आपल्या भावना बोलून दाखवल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.