हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेस बुडवण्यासाठी नेमणूक; नारायण राणेंचा घणाघात

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची औरंगजेबाशी तुलना करणारे वक्तव्य केले होते. औरंगजेब क्रूर शासक होता, आज देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रूर आहेत, असे वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. या वक्तव्यानंतर माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. हर्षवर्धन सपकाळ हा मूर्ख माणूस आहे, अशा शब्दात नारायण राणे यांनी टीका केली आहे.
काय म्हणाले नारायण राणे?
औरंगजेब कोण होता महाराष्ट्रामध्ये त्याच्याबद्दल लोक काय म्हणतात हे सगळ्यांनाच माहीत असून अशा माणसाची उपमा देत आताच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलणं मग हा मूर्ख माणूस असला पाहिजे. त्यांना या राज्यातले प्रश्न माहित नाही. कोणत्या विषयावर अध्यक्षपदाचा उपयोग करायचा आहे हे त्यांना माहित नाही. हा पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी नेमणूक झाली नाही तर पक्ष बुडवण्यासाठी त्यांची नेमणूक केली असं म्हणत नारायण राणे यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर टीका केली.
राणे काँगेसमध्ये कोणत्या महत्वाकांक्षा घेऊन गेलेले. मी काँग्रेसमध्ये गेलो नव्हतो, तर आमच्याकडे कोण आले या विषयात मला पडायचं नाही. या जुन्या विषयात मला काही बोलायचं नाही. आता मी काँग्रेसमध्ये राहिलो नाही, त्यामुळे तो विषय आजचा माझा नाही. हर्षवर्धन सपकाळ यांचा संपूर्ण राजकीय इतिहास काढा. या महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांचे योगदान काय हे सांगा आणि मग या विषयावर बोला, असेही नारायण राणे म्हटले आहेत.
नारायण राणे यांच्याकडून दोन्ही मुलांचे कौतुक
निलेश राणे कुडाळ मालवणमधून आमदार म्हणून निवडून आले म्हणून त्यांचा सत्कार आहे. नितेश राणे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मत्सोद्योग आणि बंदरेविकास मंत्री आहेत. दोन चिरंजीव आमदार आणि वडील खासदार हे देशातील एकमेव वस्तुस्थिती असेल.
माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण आहे, तो यासाठी की दोन्ही पुत्र कर्तृत्ववान निघावे हे भाग्य मला मिळालं आहे. मुलांचं कौतुक वडील करतात असं नाही. त्यांनी कर्तृत्व सिद्ध केल्यानंतर बोलतोय. माझ्या आयुष्याचा आनंदाचा हा क्षण आहे, तो यासाठी की माझे दोन्ही पुत्र कर्तुत्वान निघावे हे भाग्य मला मिळालं, अशा शब्दात नारायण राणे यांनी त्यांच्या दोन्ही मुलांचे कौतुक केले आहे.





