हर्षवर्धन पाटील, विखे, नागवडे आणि जगताप यांच्यात गुफ्तगू

श्रीगोंदा: एकीकडे माजी मंत्री बबनराव पाचपुते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेची जोरदार तयारी करीत आहेत. तर दुसरीकडे रविवारी नागवडे कारखान्यावर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खा. विखे, नागवडे, आ. जगताप यांच्यात एकत्रित झालेल्या गुफ्तगूने नव्या चर्चेला उधाण आले आहे.
रविवारी नागवडे कारखाना कार्यस्थळावर राज्य साखर संघाचे अध्यक्ष स्व. शिवाजीराव नागवडे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने कारखान्यावर नेत्यांची मांदियाळी जमली होती.

पुण्यस्मरण कार्यक्रम आटोपल्यावर नागवडे साखर कारखान्याच्या विश्रामगृहात सुरुवातीला माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, खा. डॉ. सुजय विखे, कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, अनुराधा नागवडे, दीपक नागवडे यांच्यात बंद खोलीत जवळपास वीस मिनिटे गफ्तगू झाले. त्यानंतर आमदार राहुल जगताप यांना खोलीत बोलविण्यात आले. बंद खोलीत काय चर्चा झाली, याचा तपशील समजू शकला नाही. मात्र कॉंग्रेस नेते हर्षवर्धन पाटील हे भाजपच्या उंबरठ्यावर असल्याने आणि नागवडे देखील भाजप नेत्यांशी संपर्कात असल्याने या बंद खोलीतील बैठकीला विशेष महत्त्व आहे. हर्षवर्धन पाटील यांनी सुरुवातीला विख-नागवडे यांच्यात संवाद घडवून आणला. त्यानंतर आमदार जगताप यांना बैठकीत बोलाविले. श्रीगोंद्यातील राजकीय परिस्थिती, आगामी दिशा आणि संभाव्य समीकरणांविषयी यावेळी चर्चा झाली असण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

14 सप्टेबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा तालुक्‍यातील काष्टी येथे येणार आहे. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्याकडून सभेची जोरदार तयारी सुरू आहे. अशावेळी खासदार डॉ. विखे यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांशी बंद खोलीत गुफ्तगू केल्याने तालुक्‍यात चर्चेला उधाण आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.