खासदार सुळे यांनी साधला निशाणा
इंदापूर जागेचा वाद आणखी पेटण्याची शक्यता
पुणे – आघाडीच्या जागा वाटप बैठकीत अद्याप इंदापूरच्या जागेबाबत साधी चर्चाही झालेली नाही. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीकडे राहणार की कॉंग्रेसकडे जाणार हे निश्चित नाही. असे असतानाच इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी पवार कुटुंबियांवर केलेले आरोप आमच्यासाठी धक्कादायक असून पाटील यांनी आमच्यावर केलेल्या आरोपांचे पुरावे द्यावेत, अशा शद्बात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पाटील यांच्यावर निशाणा साधला. तसेच आम्ही त्यांच्याशी संपर्क साधत आहोत. मात्र, त्यांचा फोन बंद असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सुळे यांच्या या वक्तव्यामुळे ऐन विधानसभेच्या तोंडावर इंदापूरच्या जागेचा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.
सुळे यांच्या खासदार निधीतून खडकवासला विधानसभा मतदार संघातील विविध प्रभागांतील कचरा गोळा करण्यासाठी तीन घंटागाड्या उपलब्ध करून दिल्या. त्यांचे लोकार्पन गुरुवारी झाले. यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
सुळे म्हणाल्या, हर्षवर्धन पाटील आणि आमच्यात कौटूंबिक संबंध आहेत. त्यामुळे त्यांचे बुधवारचे भाषण ऐकल्यानंतर दु:ख झाले. तसेच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यामध्ये जागा वाटपासंबंधी चर्चा सुरू आहे. काही जागांचा तिढा सुटला असून इंदापूरसंदर्भात अद्याप कसलेही बोलणे झालेले नाही. या जागेचा निर्णय होणे बाकी असताना पाटील यांचे आरोप आमच्यासाठी धक्कादायक बाब आहे. त्यामुळे त्यांनी आता आम्ही केलेल्या दगाबाजीचे पूरावे द्यावेत, असे आव्हान त्यांनी यावेळी पाटील यांना दिले. या प्रकारानंतर, मी स्वतः कालपासून संपर्क करत आहे, मात्र त्यांचा फोन बंद आहे. एका जबाबदार व्यक्तीकडे मी निरोप पाठवलेला आहे. त्यांच्याशी संपर्क होईल, हा निरोप त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचेल आणि ते आमच्याशी संपर्क साधतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भुजबळ राष्ट्रवादीतच
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर असल्याची राजकीय चर्चा सुरू असतानाच, सुळे यांनी ते सध्या राष्ट्रवादीमध्येच आहेत. या पुढील काळातही ते राष्ट्रवादीतच राहतील, याची खात्री आणि विश्वास असल्याचे सांगत त्याबाबत जास्त बोलणे टाळले. तसेच राष्ट्रवादीतून पक्षाचे नेते पक्षांतर करत असताना, ते पवार कुटुंबियांवर नाराज आहेत म्हणून नाही तर कारखाना, बॅंक, इडीची चौकशी, अशा प्रकारांमुळे जात असल्याचे सांगितले. तसेच त्यामुळे आम्ही त्यांचा द्वेष न करता त्यांना शुभेच्छा देते, अशा शद्बात पक्षाच्या गळतीवर प्रतिक्रिया दिली.