हर्षवर्धन पाटील भाजपच्या वाटेवर?

पुणे – इंदापूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलाचे संकेत माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या तयारीच्या चर्चेतून मिळू लागले आहेत.

राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस आघाडीबाबत तसेच यातून इंदापूरच्या जागेबाबत कोणताच ठोस निर्णय होताना दिसत नसल्याने याशिवाय पाटील यांनी भाजपमध्ये जावे, असे जनमत असल्याने कदाचीत माजीमंत्री हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करतील, असे अंदाज बांधले जात आहेत. यामुळे इंदापूर विधानसभा मतदार संघातील राजकीय स्थितीत मोठे बदल होणार आहेत.

माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील हे भाजपच्या तंबूत दाखल झाल्यास इंदापूर विधासनभा मतदारसंघात आघाडीला मोठा फटका बसण्याची शक्‍यता आहे. आघाडीच्या जागावाटपात माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकरीता इंदापूर मतदार संघ सोडायचा की जुन्या सुत्रानुसार विद्यमान आमदार असलेल्या पक्षाकडेच हा मतदार संघ राहणार, याबाबत कोणातच निर्णय होत नसल्याने भाजपच्या गळाला कॉंग्रेसचे मातब्बर नेते असलेले हर्षवर्धन पाटील लागण्याची शक्‍यता आहे.

माजीमंत्री पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तरी युतीच्या नियमानुसार इंदापूरची जागा शिवसेनेकडे आहे. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तरी महायुतीच्या जागा वाटपात शिवसेनेच्या कोट्यातील इंदापूरची जागा भाजपच्या ताब्यात जाणार का? याबाबतही शंका घेतली जात आहे. यामुळे पाटील यांनी भाजपाऐवजी शिवसेनेत का प्रवेश केला नाही? असाही सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, इंदापूर तालुक्‍यात हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला ऊत आला आहे. मात्र, हर्षवर्धन पाटील यांनी अधिकृत वक्‍तव्य केले नाही. त्यामुळे या चर्चा पेल्यातील वादळ ठरणार काय, याची उत्सुकता लागून
राहिली आहे.

मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांशी जवळीक…
इंदापूर तालुक्‍यातील राजकारणाला पाच वर्षांत कलाटणी देणाऱ्या घडामोडी घडल्या. पंधरा वर्षांत एकछत्री अंमल प्रस्थापित करणाऱ्या पाटील यांना आमदार भरणे यांनी चांगलीच टक्‍कर देत आपले बस्तान बसविले. यातून पाटील यांनी स्वत:ला सावरून कार्यकर्त्यांची मोट बांधून पाच वर्षांत मतदारसंघ पिंजून काढला. मागील लोकसभेला राष्ट्रवादीला मदत करूनही विधानसभेला पाटील यांच्याबरोबर राजकीय धोका झाला. तरीही यावेळच्या लोकसभेला पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना इंदापूर तालुक्‍यातून मताधिक्‍य मिळवून दिले. त्यामुळे त्यांना विधानसभेला मदत करू,असाही शब्द पाटील यांना दिला गेला. परंतु, इंदापुरातील राजकीय स्थिती मात्र वेगळेच सांगत आहे. यामुळेच पाटील यांनीही सावध भूमिका घेत भाजपची वाटेवर थांबण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या महिन्यात पाटील यांच्या विधानगाथा पुस्तक प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली होती. त्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी झालेली बैठक सर्व काही स्पष्ट करीत आहे.

…तोपर्यंत भूमिका जाहीर नाही
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे भाजपच्या संपर्कात आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांची चर्चा झाली. त्यानंतर भाजपशी त्यांची 1995 पासून जवळीक आहे. दोन पाटलांच्या भेटीने त्यांच्या भाजप प्रवेशाने आज दिवसभर राज्यात चर्चेचा जोर पकडला आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांकडून भाजप प्रवेशाचा आग्रह हा वादळीपूर्वीची शांतता की दबावतंत्राचा वापर, याविषयी तर्क-वितर्क लढविले जात आहे. यामुळे आघाडीचा निर्णय कॉंग्रेस-राष्ट्रवादीला तातडीने जाहीर करावा लागणार आहे. मात्र, यातून आमदार भरणे की माजी मंत्री पाटील याचेही कोडे आडवे येणार आहे. तोपर्यंत पाटील हे सुद्धा आपली भूमिका जाहीर करणार नाहीत, असेही सांगितले जात आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)